fbpx

आरोप सिद्ध होतील आणि भुजबळ पुन्हा तुरुंगात जातील : अंजली दमानिया

टीम महाराष्ट्र देशा- छगन भुजबळ यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते एका बाजूला जल्लोष करत असताना पहायला मिळत आहे. भुजबळ यांना जामीन मिळाल्यानंतर आता राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या  अंजली दमानिया यांची देखील प्रतिक्रिया आली आहे. छगन भुजबळ यांना कोर्टाने निर्दोष सोडलेलं नाही. त्याच्या विरोधात केलेले सर्व आरोप सिद्ध होतील आणि ते तुरुंगात परत जातील असा विश्वास दमानिया यांनी व्यक्त केला आहे.

नेमकं काय म्हणाल्या आहेत अंजली दमानिया
छगन भुजबळ यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उत्सव साजरा करत आहे. परंतु मी त्यांना आठवण करून देऊ इच्छिते  की हे फक्त एक बेल आहे. त्यांना निर्दोष सोडलेलं नाही. त्याच्या विरोधात केलेले सर्व आरोप सिद्ध होतील आणि ते तुरुंगात परत जातील असं ट्वीट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलं आहे.

दरम्यान, आज छगन भुजबळ यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. भुजबळ यांनी २ एप्रिल रोजी जामिनासाठी अर्ज केला होता, न्यायमूर्ती पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठाने आज जामीन मंजूर केला . त्यामुळे गेली दोन वर्षापासून तुरुंगात असणारे भुजबळ यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

बुधवारी न्यायमूर्ती पी.एन. देशमुख यांच्या खंडपीठासमोर या अर्जावर सुनावणी घेण्यात आली. तेव्हा दोन वर्षांहून अधिक काळापासून आपण तुरुंगात आहोत, आपले वय आता ७१ वर्षे झाले आहे, त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन आपली जामिनावर सुटका करावी, अशी विनंती त्यांनी हायकोर्टात केली होती

काय आहे प्रकरण ?

दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ हे मार्च २०१६ पासून तर त्यांच्या पुतण्या समीर भुजबळ फेब्रुवारी २०१६ पासून कैदेत आहेत. याआधीही पीएमएलए कोर्टाने तसेच मुंबई उच्च न्यायालयानं छगन भुजबळांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. सर्वोच्च न्यायालयाने पीएमएलए कायद्याचे ४५ (१) हे कलम नुकतेच रद्द केले आहे. त्याचा फायदा घेत आपली जामिनावर मुक्तता करण्याची मागणी भुजबळ यांनी केली होती.