नाव घेतल्याने कोणी हिंदूह्रदयसम्राट होत नाही, अनिल परबांनी लगावला मनसेला टोला

टीम महाराष्ट्र देशा : ‘नाव घेतल्याने कोणी हिंदूह्रदयसम्राट होत नाही आणि हिंदुंची मत देखील मिळत नाही, असा टोला शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परब यांनी राज ठाकरेंना लगावला आहे. मनसेच्या पहिल्या अधिवेशनानंतर ठाण्यातील मनसेच्या कार्यालयाबाहेर लागलेल्या बॅनर आणि सोशल मीडियावरही अनेक पोस्टमध्ये राज ठाकरेंचा उल्लेख हिंदूह्रदयसम्राट असा करण्यात येत आहे. तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटोही वापरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शिवसेना – मनसेत एका वादाला तोंड फुटले आहे.

मंत्री अनिल परब म्हणाले, ‘ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदूंसाठी मोठ्या प्रमाणावर योगदान दिले आहे. त्याचप्रमाणे मनसेने याआधीचा झेंडा विविध धर्मियांना आकर्षित करण्यासाठी वापरला होता, त्याचं काय झालं असा सवाल देखील अनिल परब यांनी उपस्थित केला आहे.

या मुद्द्यावरून आता शिवसेना आणि मनसेमध्ये आता राजकीय वातावरण आणखी तापणार असल्याच बोललं जात आहे. अशातच मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ठाण्यातील मध्यवर्ती कार्यालयाबाहेर साहेबांचे खरे वारसदार हिंदूहृदयसम्राट राज ठाकरे या प्रकारचे बॅनर लावल्याने शिवसेना विरुद्ध मनसे असा कलगीतुरा रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.