राज्यातील बाधित क्षेत्रातील काराग्रुहे तातडीने लॉकडाऊन करा : अनिल देशमुखांचे आदेश

मुंबई : कारागृहात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोरोनाबाधित क्षेत्रातील कारागृहे तातडीने लॉकडाऊन करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.या निर्णयानुसार राज्यातील मुंबई मध्यवर्ती कारागृह,ठाणे मध्यवर्ती कारागृह, येरवडा मध्यवर्ती कारागृह,भायखळा जिल्हा कारागृह,व कल्याण जिल्हा कारागृहही कारागृहे लॉकडाऊन करण्यात येत आहेत.

या संबंधित कारागृह अधीक्षकांनी कारागृहात अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक दोन शिफ्टमध्ये करावी. जे अधिकारी कर्मचारी कारागृहात काम करतील त्यांच्या भोजन व निवासाची व्यवस्था आतच करण्यात करण्यात यावी. मेन गेट हे लॉकडाऊन काळात पूर्णतः बंद राहील याची दक्षता घ्यावी. कारागृहात काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाकडे कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दूरध्वनी व भ्रमणध्वनी नंबर देण्यात येतील. जर कुटुंबाला काही अडचण भासली त्यांनी वरिष्ठांकडे संपर्क साधावा. ज्यायोगे त्यांच्या अडीअडचणीचे निराकरण होईल. संबंधित कारागृहांना या सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.

दरम्यान, ”राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे बाहेरची परिस्थिती अधिक भयानक आहे. त्यामुळे तुरुंगामध्ये असलेल्या कैद्यांनी सध्या तुरुंगामध्येचं राहिलेलं बरं,’ अशा शब्दात हायकोर्टाने आपला निर्णय दिला आहे. हाय कोर्टाचे न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी हा निर्णय दिला. यावेळी बोलताना न्या. गौतम पटेल म्हणाले, "तुम्हाला कल्पना नसेल की मुंबईत सध्या काय सुरूय,  वरळीचं उदाहरण देत न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी या सुनावणी दरम्यान आपली चिंता व्यक्त केली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईतील अनेक विभाग एकापाठोपाठ एक सील करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत आणखीन एका नव्या माणसाला बाहेर सोडून त्याच्यासह इतरांनाही कोरोनाची लागण होण्याचा धोका पत्करता येणार नाही.”