शाळांनाही पाच दिवसाचा आठवडा करा; जनता शिक्षक महासंघाची मागणी

मुंबई : बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळ बैठक पार पडली. ठाकरे सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठं गिफ्ट दिलं आहे. पुढील महिन्यापासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू केला जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला.

येत्या 29 फेब्रुवारीपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांच्या आठवड्याची अंमलबजावणी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांनादेखील पाच दिवसांचा आठवडा करण्याची मागणी जनता शिक्षक महासंघाचे मुंबई-कोकण विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी शालेय शिक्षण विभागाकडे केली.

‘मुंबईतील अनेक शाळा ह्या दुबार अधिवेशनात भरतात. दोन्ही अधिवेशनातील शाळा 15 मिनिटे आधी आणि 15 मिनिटे उशिरा सोडून पाच दिवसांचा आठवडा करणे शाळांना सहज शक्य असल्याने शालेय शिक्षण विभागाने याबाबत शासन निर्णय काढून शाळांचा पाच दिवसांचा आठवडा करावा,’ असे अनिल बोरनारे म्हणाले.

दरम्यान, ‘शनिवारी अर्धा दिवस शाळा असते. शनिवारच्या अर्ध्या दिवसाच्या तासिका सोमवार ते शुक्रवार विभागून देता येऊ शकतात. त्यामुळे पाच दिवसांचा आठवडा शक्य असल्याचे बोरनारे यांनी सांगितले. तसेच माध्यमिक शाळा संहितेनुसार, शाळा पाच दिवसांचा आठवडा करु शकतात. अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी आपल्या शाळांचा आठवडा पाच दिवसांचा केला आहे. पण, बहुतांश शाळा अजूनही सहा दिवस भरतात, असेदेखील ते म्हणाले.