fbpx

सुपारी देऊन अनिकेत कोथळे याचा खून झाल्याचा कुटुंबियांचा आरोप

Aniket Kothale Murder News

सांगली : दुकानात सुरू असलेल्या अवैध व्यवसाय सुरू असल्याची कुणकूण लागल्यानेच अनिकेत कोथळे याचा दुकान मालकाकडून निलंबित पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे याला सुपारी देऊन खून करण्यात आला असावा, असा आरोप अनिकेतच्या कुटुंबियांनी केला. त्यावेळी अनिकेत कोथळे याचे वडिल अशोक, आई अलका, पत्नी संध्या, भाऊ अमित व आशिष यांच्यासह या प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी अमोल भंडारे याचा चुलता दीपक भंडारे, कॉंग्रेसचे सांगली विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष मंगेश चव्हाण व सांगली महापालिकेचे नगरसेवक युवराज बावडेकर आदी उपस्थित होते.

अनिकेत कोथळे हा सांगली शहरातील हरभट रस्त्यावरील लकी बॅग्ज या दुकानात कामाला होता. या दुकानाच्या वरील मजल्यावर चालणा-या विविध अवैध व्यवसायांची कुणकूण त्याला लागली होती. त्याठिकाणी युवराज कामटे याचेही वरचेवर येणे- जाणे होते. या अवैध व्यवसायांची बाहेर कोठेही वाच्यता करू नको, यासाठी संबंधित दुकानदार व युवराज कामटे या दोघांनी अनिकेत कोथळे याला पैशाचे आमिषही दाखविले होते.

या कालावधीत पगार देण्याच्या कारणावरून अनिकेत कोथळे याचा दुकान मालकाशी वाद झाला होता. त्यावेळी अनिकेत कोथळे याने पगार मिळण्यासाठी दुकान मालकावर दबावही आणला होता. दुकान मालकाने युवराज कामटे याला अनिकेत कोथळे याला धडा शिकविण्याची सुपारी दिली होती. त्यातूनच युवराज कामटे याने आपल्या पदाचा गैरवापर करून अनिकेत कोथळे याला खोट्या गुन्ह्यात अडकविले होते व या गुन्ह्याच्या नावाखालीच अनिकेत कोथळे याला अमानुष मारहाण करून त्याचा खून करण्यात आला, असा आरोपही त्याच्या कुटुंबियांनी केला.

या खूनप्रकरणी पोलिस उपअधिक्षक डॉ. दीपाली काळे यांनीही कोथळे कुटुंबियांची सातत्याने दिशाभूल केली. अनिकेत कोथळे याचा घातपात झाला नसून तो पळून गेला असल्याचेच त्या वारंवार छातीठोकपणे सांगत होत्या. मात्र मागणी करूनही त्यांनी सीसीटिव्ही फुटेज दाखविले नाही. अखेर लोकप्रतिनिधींनी दबाव आणल्यानंतर दीपाली काळे यांनी हे सीसीटिव्ही फुटेज डिलीट झाल्याचे सांगितले. एकूणच या सर्व प्रकरणात त्यांची भूमिका संशयास्पद असल्याने त्यांनाही सहआरोपी करावे, अशी मागणीही कोथळे कुटुंबियांनी केली.