अनिकेत कोथळेच्या भावांचा पोलीस ठाण्याबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न

aniket-kothale-family

सांगली:पोलिसांच्या थर्ड डीग्रीत मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळेच्या दोन्ही भावांनी तपास योग्य पद्धतीने होत नसल्याचा आरोप करत पोलीस ठाण्याबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला. अमित कोथळे आणि आशिष कोथळे अशी या भावंडांची नावे असून पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहे. अनिकेत कोथळे मृत्यूप्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी यापूर्वीही केला होता. मंगळवारी अनिकेतचे भाऊ अमित आणि आशिष कोथळे या दोघांनी सांगली शहर पोलीस ठाण्याबाहेर अंगावर पेट्रोल ओतून स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. ड्यूटीवरील पोलीस कर्मचाऱ्यांनी दोघांना वेळीच रोखले आणि पुढील अनर्थ टळला.

काय आहे प्रकरण ?

अनिकेत कोथळे या तरुणाला सांगली शहर पोलिसांनी जबरी चोरी प्रकरणी ६ नोव्हेंबर रोजी अटक केली होती. चौकशी दरम्यान पोलिसांनी अनिकेतला बेदम मारहाण केली आणि या मारहाणीत अनिकेतचा मृत्यू झाला. यानंतर पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे आणि अन्य पाच पोलिसांनी अनिकेतचा मृतदेह आंबोलीतील जंगलात नेऊन जाळला. अनिकेत पोलिसांच्या तावडीतून पळाला, असा बनावही पोलिसांनी रचला होता. मात्र अनिकेतच्या कुटुंबीयांनी पाठपुरावा केल्याने अनिकेतचा मृत्यू झाल्याचे समोर आले. याप्रकरणी युवराज कामटेसह पाच जणांना अटक करण्यात आली. तर सांगली शहर पोलीस ठाण्यातील सात कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले.