‘अंगुरी भाभी’ आता राजकारणात

टीम महाराष्ट्र देशा – राजकारण आणि सिनेसृष्टी याचं जवळच नात आहे. कारण अनेक सिनेकलाकार आपल्याला राजकीय व्यासपीठावर दिसतात तर काही सिनेकलाकार चक्क निवडणूक लढवताना दिसतात. याच अनुषंगाने ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेत अंगुरी भाभीची भूमिका साकारणाऱ्या तसेच बिग बॉस-11 च्या विजेत्या अभिनेत्री शिल्पा शिंदे या आज राजकारणात पदार्पण करणार आहेत. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत शिल्पा शिंदे यांचा पक्षप्रवेश होणार आहे.

‘भाभीजी घर पर है’ ही मालिका अतिशय लोकप्रिय झाली होती. या मालिकेतून शिल्पा यांची अंगुरी भाभीची व्यक्तिरेखा चांगलीच गाजली आहे. या मालिकेमुळे तिचा मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे. याच गोष्टी लक्षात घेऊन काँग्रेसनं शिल्पाला पक्षात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे तिला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाणार का, याबद्दल प्रश्न निर्माण होत आहेत.

कॉंग्रेस पक्षाने येत्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला पराभूत करण्यासाठी अनेक कुरघोडी केल्या आहेत. त्यात सर्वात मोठी कुरघोडी म्हणजे समविचारी पक्षांना एकत्र घेवून केलेली महाआघाडी होय. तसेच आता कॉंग्रेसने येत्या निवडणुकांसाठी अजून एक अस्त्राचा वापर केला आहे तो म्हणजे प्रसिद्ध कलाकारांच्या लोकप्रियतेचा फायदा या निवडणुकीत करून घेणार असल्याच दिसत आहे. याआधी कॉंग्रेस कडून दक्षिण मुंबई मतदारसंघात लोकसभेसाठी गोविंदाचा भाचा कृष्णा म्हणजेच अभिषेक शर्मा याचे नाव पुढे आले होते. तर आता शिल्पा शिंदे या तर थेट पक्षप्रवेश करणार आहेत.