अनिकेत कोथळे हत्याप्रकरणी पाच जणांना १२ दिवसांची पोलिस कोठडी

aniket kothale sangli

सांगली : सांगली शहर पोलिस ठाण्याच्या पोलिस कोठडीतील आरोपीच्या खूनप्रकरणी अटकेत असलेल्या निलंबित गुन्हे प्रकटीकरण (डीबी) शाखेचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे व त्याच्या पाच साथीदारांना गुरूवारी येथील मुख्य न्यायदंडाधिकारी पी. पी. खापे यांनी १२ दिवसांची पोलिस कोठडी दिली. त्यावेळी न्यायालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिस कोठडी देण्यात आलेल्या युवराज कामटे, अरूण टोणे, नसरूद्दीन मुल्ला, राहूल शिंगटे व झाकीर पट्टेवाले या पाचजणांचा समावेश आहे. यातील अरूण लाड याला या गुन्ह्याकामी तपासासाठी आंबोली घाट येथे नेण्यात आल्याने तो आज न्यायालयात गैरहजर होता.

या सर्व आरोपींना बुरखा घालून येथील न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी या आरोपींना पाहण्यासाठी न्यायालय परिसरात मोठी गर्दी झाली होती. सरकार पक्षाच्यावतीने उज्ज्वला आवटे यांनी या सर्वांना पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी केली, तर आरोपी यांच्यावतीने कायदेशीर सल्लागारामार्फत आपणाला वकील मिळावा, असा विनंती अर्ज न्यायालयात केला.

लूटमारी प्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या अनिकेत अशोक कोथळे (वय २६, रा. भारतनगर, कोल्हापूर रस्ता, सांगली) या आरोपीचा युवराज कामटे याच्यासह या सर्वांनी केलेल्या अमानुष मारहाणीत मृत्यू झाला होता. हा खून पचविण्यासाठी या सर्वांनी अनिकेत कोथळे व त्याच्या साथीदाराने पलायन केल्याचा बनावही केला होता. वास्तविक, या सर्वांनी अनिकेत कोथळे याचा मृतदेह आंबोली घाटात नेऊन जाळला होता.

दरम्यान, राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) व सांगली जिल्हा पोलिस यांच्या अधिकारी व कर्मचा-यांनी गुरूवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आंबोली घाटात महादेवगड येथे अनिकेत कोथळे याचा अर्धवट स्थितीत जळलेला मृतदेह ताब्यात घेतला. हा मृतदेह ८० टक्के जळून खाक झालेला आहे. या मृतदेहाचा पंचनामा करण्यासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील तज्ञांना बोलाविण्यात आले होते. हा पंचनामा सिंधुदुर्ग येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व पोलिस उपअधिक्षक यांच्यासमोर करण्यात आला. त्यानंतर हा मृतदेह मिरज येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या शासकीय रूग्णालयात शवविच्छेदनासाठी रात्री उशिरा आणण्यात आला.

युवराज कामटे याच्यासह त्याच्या साथीदारांनी महादेवगड येथील जंगलातील उतारावर लाकडे गोळा करून पेट्रोल- डिझेलच्या वापराने अनिकेत कोथळे याचा मृतदेह जाळला असल्याचे सामोरे आले आहे. युवराज कामटे याच्यासह पाचजण लवकरच बडतर्फ – विश्‍वास नांगरे-पाटील

अनिकेत कोथळे याला अमानुष मारहाण करून त्याचा मृतदेह आंबोली घाट (जि. सिंधुदुर्ग) येथे नेऊन जाळणा-या सांगली शहर पोलिस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण (डीबी) शाखेचा प्रमुख निलंबित पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे याच्यासह त्या चार पोलिस कर्मचा-यांना लवकरच बडतर्फ करण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे- पाटील यांनी दिली.

या प्रकरणाचा संपूर्ण तपास राज्य गुन्हा अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला असून या विभागाचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक नरेंद्र गायकवाड व पोलिस उपअधिक्षक मुकुंद कुलकर्णी तपास करणार आहेत. या तपासात या विभागाला आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असेही विश्‍वास नांगरे- पाटील यांनी सांगितले.