अंगारकीसाठी गणपतीपुळ्यात चोख बंदोबस्ताची व्यवस्था

टीम महाराष्ट्र देशा – गेल्या दहा दिवसांत गणपतीपुळे येथील समुद्रात बुडणा-यांना वाचवण्याचे प्रकार पाठोपाठ घडले. येत्या मंगळवारी (दि. ७ नोव्हेंबर) गणपतीपुळ्यात अंगारकीनिमित्त भक्तांची मोठी गर्दी होईल. त्यासाठी आवश्यक त्या सोयीसुविधा आणि सुरक्षिततेचे उपाय याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी गणपतीपुळे परिसराची पाहणी केली. सहका-यांना योग्य त्या सूचना दिल्या. अंगारकीसाठी येणा-या भाविकांची पार्किंगची व्यवस्था, श्रीदर्शनासाठी रांग, मंदिर परिसर, पालखी प्रदक्षिणा या मार्गाची पाहणी इंगळे यांनी केली. त्यांच्यासोबत जयगड पोलीस ठाण्याचे निरीक्षक इंद्रजित काटकर, पोलीस उपनिरीक्षक कांबळे, सहायक पोलीस निरीक्षक बनप आदी कर्मचारी होते. सागरदर्शन पार्किंग, गणपतीपुळे मंदिर, संस्थानात दर्शनासाठी बांधलेल्या अतिरिक्त रांगा यांचीही पाहणी केली. दर्शनासाठीच्या रांगा व परिसरातील विद्युत व्यवस्था, पाण्याची व्यवस्था आणि आपत्कालीन सुरक्षा व्यवस्था, रुग्णवाहिकेची सोय या सा-याचा आढावा घेतला.

चौपाटीवरील जीवरक्षकांना योग्य त्या सूचना दिल्या. अंगारकीदरम्यान आपटा तिठा, कोल्हटकर तिठा, मोरया चौक, मंदिर परिसर, गाभारा आणि दर्शनासाठीची रांग येथे २० पोलीस अधिकारी व १६० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. तसेच चौपाटी, पेट्रोलिंग, वाहतूक नियंत्रण यासाठीही पोलीस फाटा तैनात करण्यात येणार आहे. गर्दीच्या कालावधीत अंगारकी चतुर्थीसाठी आलेल्या भाविकांनी आपल्या गाड्या सागरदर्शन पार्किंगमध्ये लावाव्यात, समुद्रामध्ये कोणीही आंघोळीसाठी जाऊ नये, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. भाविकांनी या सूचनांचे पालन करावे, अशी विनंती सरपंच महेश ठावरे यांनी केले आहे