मानधनवाढ होऊनही संप सुरु ठेवणे चुकीचे; अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी तातडीने सेवेवर रुजू व्हावे – पंकजा मुंडे

मुंबई : मानधनवाढीची मागणी शासनाने मान्य केलेली असताना देखील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या काही संघटनांनी अजुनही संप सुरु ठेवला आहे. हे चुकीचे असून उर्वरीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी तातडीने संप मागे घेऊन सेवेवर रुजू व्हावे, असे आवाहन महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागणीस अनुसरुन आमच्या शासनाने मागील तीन वर्षात दोन वेळा मानधनवाढ केली आहे. २०१४-१५ मध्ये २८९ कोटी रुपयांची तर आता साधारण ३६३ कोटी रुपयांची ऐतिहासिक मानधनवाढ केली आहे. नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दीड हजार रुपयांची मानधनवाढ करण्यात आली आहे. त्यांच्या एकूण मानधनाच्या ३० टक्के इतकी ही वाढ आहे. यापूर्वी एका वेळेस इतकी मानधनवाढ कधीही देण्यात आली नव्हती. याशिवाय भाऊबीजही दुप्पट करण्यात आली आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधन व इतर मागण्यांबाबत भविष्यात अजुनही निर्णय घेण्याबाबत शासन पूर्ण सकारात्मक आहे. पण आत्ताच मानधनवाढ दिली असताना ती मान्य न करता अधिक मानधनवाढीसाठी बालकांना वेठीस धरणे चुकीचे आहे. हे कोणत्याही प्रकारे समर्थनीय नसून उर्वरीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी तातडीने संप मागे घेऊन सेवेवर हजर व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

जेलभरोसारखे आंदोलन चुकीचे – कमलाकर फंड

आपल्या मागणीसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जेलभरोसारखे आंदोलन करणे चुकीचे व बेकायदेशीर असून शासकीय कर्मचाऱ्यांकडून अशी कृती कोणत्याही प्रकारे स्वीकारार्ह नाही, असे एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे आयुक्त कमलाकर फंड यांनी कळविले आहे. आंदोलनकाळात शासनाचे मुख्यमंत्री, मंत्री यांच्यावर वैयक्तिक शेरेबाजी करणे, व्यंगचित्रे – फलक याद्वारे त्यांची वैयक्तिक बदनामी करणे, पुतळे जाळणे हेही चुकीचे आहे. संप करणे, निवेदन देणे असे वैधानिक मार्ग उपलब्ध असताना इतर बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करणे चुकीचे आहे. अशी कृती केल्यास शासनाकडून त्याची गंभीर दखल घेतली जाईल, असे आयुक्त श्री. फंड यांनी कळविले आहे.

You might also like
Comments
Loading...