Android: अँड्रॉइड ‘ओ’ बाबत उत्सुकता

गुगल लवकरच आपल्या अँड्रॉइड या ऑपरेटींग सिस्टीमची ‘ओ’ ही नवीन आवृत्ती सादर करण्याची शक्यता असून याबाबत टेकवर्ल्डमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या वर्षी मे महिन्यात झालेल्या गुगलच्या आय/ओ परिषदेत पहिल्यांदा अँड्रॉइड ७.० अर्थात ‘एन’ ही आवृत्ती जगासमोर प्रदर्शीत करण्यात आली होती. यानंतर सप्टेंबर महिन्यात या आवृत्तीला नोगट हे नाव देत ती युजर्सला सादर करण्यात आली होती. या पार्श्‍वभूमिवर या वर्षीच्या आय/ओ परिषदेत अँड्रॉइड ८.० म्हणजेच ‘ओ’ ही आवृत्ती सादर होणार आहे. आजवर अँड्रॉइडच्या सर्व आवृत्त्यांना मिष्ट पदार्थावरून नाव देण्यात आले आहे. अलीकडच्या आवृत्त्यांना किटकॅट, लॉलीपॉप व मार्शमॅलो ही देण्यात आलेली नावे याचीच निदर्शक आहेत. या पार्श्‍वभूमिवर अँड्रॉइडच्या पुढील आवृत्तीचे नाव ‘ओ’ अक्षरापासून सुरू होणार्‍या गोड पदार्थाचे असेल हे निश्‍चित. याचा विचार करता अँड्रॉइड ८.० ही आवृत्ती ‘ओरियो’ म्हणून ओळखली जाईल असा दावा करण्यात येत आहे. याचनुसार यातील विविध संभाव्य फिचर्सबाबतही उत्सुकता लागली असून याबाबत चर्चा होत आहे. अर्थात याबाबत अधिकृत माहिती ही गुगलच्या आय/ओ परिषदेतच जाहीर करण्यात येणार आहे. यामुळे आता या परिषदेकडेच सर्वांचे डोळे लागले आहे.