इंदुरीकर महाराज आपल्या भक्तांवर गर्भलिंग निदान करण्याचेच संस्कार करतात का, अंनिसचा इंदुरीकरांना सवाल

पुणे : महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची खूप मोठी परंपरा आहे. इथे सर्वजण एकमेकांना माऊली म्हणून संबोधत एकमेकांच्या पाया पडत असतात. पण निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर महाराज) त्यांच्या कीर्तनातून महिला- मुलींची टिंगल टवाळी, अपमानस्पद बोलत असतात. आपल्या देशात आधीच मुलींची संख्या कमी असताना इंदुरीकरांनी पुराणातील संदर्भ देत जी गर्भलिंग निदानाची जाहिरात केली आहे ती अत्यंत आक्षेपार्ह आहे. अशी सणसणीत प्रतिक्रिया अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या रंजना गवांदे यांनी ‘महाराष्ट्र देशा’ शी बोलताना दिली आहे.

त्यांच्या या गर्भलिंग निदानाच्या या वक्तव्यावर पीसीपीएनडीटी, आयपीसी आणि ड्रग्ज अँड मॅजिक कायद्यांतर्गत सोमवारी (ता. १७) ला नगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, ‘आपल्या देशात महिला सक्षमीकरणासाठी कठोर कायदे असतानाही त्यांनी अशी जाहिरात केली. मात्र आपला देश हा धर्मग्रंथांवर नाही तर संविधानावर चालतो, हे देशातील प्रत्येक नागरिकाने लक्षात ठेवले पाहिजे आणि या कायद्यांचा आदर केला पाहिजे. मात्र इंदुरीकरांच्या गर्भलिंग निदान चाचणीच्या त्यांच्या या विधानाला त्यांच्या ज्या भक्तांनी समर्थन दिले त्यांच्यावर महाराज हेच संस्कार करतात का ? असा प्रश्नही त्यांनी अंनिसच्या वतीने यावेळी विचारला.

दरम्यान, समतिथीला मुलगा आणि विषमतिथीला मुलगी होते. या वक्तव्याने वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या इंदुरीकर महाराजांनी काल रात्री केलेल्या किर्तनात भाष्य केल. “दोन तासांच्या किर्तनात एखादं वाक्य चुकीचं जाऊ शकतं. मात्र मी जे बोललो, ते चुकीचं नाहीच. मी बोललेलं अनेक ग्रंथात नमूद आहे. वादामुळे मला खूप त्रास होत आहे. एक दोन दिवस बघेन आणि किर्तन सोडून शेती करेन” असं इंदुरीकर म्हणाले.

“यूट्यूबवाले काड्या करतात. यूट्यूब चॅनलवाल्यांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला. परंतु सांगतो चॅनल संपतील पण मी नाही”, असंही इंदुरीकर महाराज म्हणाले. या किर्तनात इंदुरीकरांनी सर्व प्रकरणाचा रोष यूट्यूब चॅनलवर व्यक्त केला.