“भुंकणाऱ्यांकडे लक्ष देत नाही” – हेगडे

हेगडेंच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच ,हेगडेंच्या वक्तव्यावर दलित संघटना संतप्त

टीम महाराष्ट्र देशा- केंद्रीय कौशल्य आणि उद्योजकता विकास मंत्री अनंतकुमार हेगडे बल्लारी येथे कार्यक्रमासाठी जाताना त्यांच्या गाडीसमोर दलित आंदोलकांनी निदर्शने करुन त्यांच्या याआधीच्या वक्तव्यांचा निषेध केला. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नानुसार भारताचे रुपांतर ‘स्कील्ड भारता’मध्ये रुपांतर करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. ‘भुंकणाऱ्या भटक्या कुत्र्यां’कडे लक्ष न देता आम्ही आमच्या बांधिलकीसह या मार्गावर चालत राहू, असे विधान केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

अनंतकुमार हेगडे यांची वादग्रस्त विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी त्यांनी वादग्रस्त विधान करुन रोष ओढाऊन घेतला होता. ‘स्वतःला सेक्युलर, धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्यांना त्यांच्या आई-बापांचा पत्ता नसतो. आम्ही राज्यघटना बदलण्यासाठीच सत्तेत आलोय,’ असं वक्तव्य हेगडे यांनी याआधी केलं होतं.

या विधानावर आता टीका होऊ लागली असून अनंतकुमार हेगडे यांच्या या विधानाचा अभिनेते प्रकाश राज यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. हेगडेंनी दलितांबाबत अपशब्द वापरून त्यांचा अपमान केला असल्याचे प्रकाश राज यांनी ट्विटरवर म्हटले आहे. अनंतकुमारांचं आता अति झालं अनंतकुमार हे वारंवार दलित समाजाबाबत अपशब्द वापरत आहेत. आता तर त्यांनी दलितांना कुत्रे म्हणण्यापर्यंत मजल मारली आहे. हे आता अति झालं आहे. त्यामुळे त्यांच्यावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी कारवाई करून त्यांना पदावरून हाकलावे अन्यथा हेगडेंच्या वक्तव्यांना तुमचा छुपा पाठिंबाच आहे, असे मानले जाईल, असे प्रकाश राज यांनी म्हटले आहे.

भटके कुत्रे हा शब्दप्रयोग केल्यावर दलितांमध्ये पुन्हा संतापाची लाट उसळली आणि कार्यक्रमानंतर त्यांनी हेगडे यांच्याविरोधात पुन्हा निषेध नोंदवला आहे.