प्रकाश आंबेडकरांना धक्का,आनंदराज आंबेडकर ‘वंचित’ आघाडीमधून बाहेर

blank

औरंगाबाद : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपली दखल घेण्यास भाग पाडणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीला मोठा धक्का बसला आहे. आनंदराज आंबेडकर यांनी वंचित आघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे.नामविस्तार दिनाच्या निमित्ताने आनंदराज आंबेडकर यांनी औरंगाबादेत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत आनंदराज आंबेडकर यांनी वंचितमधून बाहेर पडण्यासाठी घोषणा केली आहे.

माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, वंचित बहुजन आघाडीमुळं आंबेडकरी समाजात नैराश्य आलं आहे, असा थेट आरोप रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी केला आहे . यावेळी पत्रकारांशी बोलताना आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. विशेष म्हणजे यावेळी आनंदराज आंबेडकरांनी आंबेडकरी जनतेला नवा पर्याय देणार असल्याचंही म्हटलं.

आंबेडकरी चळवळ पायावर उभी रहावी म्हणून आम्ही वंचितला पाठिंबा दिला होता, आता फक्त रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून आम्ही जनतेसाठी काम करून सत्तेपर्यंत पोहोचू, असं आंबेडकरांनी सांगितलं आहे. गटातटाना एकत्र कऱणं शक्य नाही, मात्र जमेल तेवढ्यांना आमच्या सेनेत आणून आम्ही ऐक्य करू आणि येणा-या औरंगाबाद महापालिका निवडणुकीत आम्ही आमच्या बळावर उमेदवार उभे करू असं आनंदराज आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

वंचित आघाडीमध्ये जे इतर घटक सोबत आले होते त्यांचे मतदान त्यांना मिळाले नाही. म्हणून ही वेळ आल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. आनंदराज आंबेडकर वेगळे झाल्याने वंचित आघाडीला आणखी एक धक्का बसला आहे.