अंधेरीतील कामगार रुग्णालयात अग्नितांडव, 2 रुग्णांचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील अंधेरी एमआयडीसी भागात सोमवारी संध्याकाळी भीषण आग लागली. ‘ईएसआयसी’ कामगार रुग्णालयात लागलेल्या आगीवर दोन तासांनंतर अखेर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. चौथ्या मजल्यावरील ऑपरेशन थिएटरच्या जवळ शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीमुळे रुग्णालय परिसरात धुराचे प्रचंड लोट वाहत होते.

अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी आग पूर्णपणे विझवण्याचा प्रयत्न करत होत्या. दरम्यान,या आगीत दोघा जणांना प्राण गमवावे लागल्याचं समोर आलं असून, 108 जण जखमी झाले आहेत.

कामगार रुग्णालयात दुपारी चार वाजताच्या सुमारास आग लागली होती.धुरात गुदमरल्यामुळे जखमींचा आकडा वाढल्याची माहिती आहे. १० रुग्णांना कूपर रुग्णालय, ३ रुग्णांना ट्रॉमा आणि १५ रुग्णांना सेव्हन हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाबाहेर बघ्यांनी गर्दी केल्याने मदतकार्यात आणि आग विझविण्याचा कार्यात व्यत्यय येत होता. सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास आग आटोक्यात आली.