आनंद तेलतुंबडेची अटक बेकायदेशीर; तातडीने मुक्त करण्याचे न्यायालयाचे आदेश

टीम महाराष्ट्र देशा – डॉ. आनंद तेलतुंबडे यांना झालेली अटक ही बेकायदेशीर आहे , त्यांना तातडीने मुक्त करण्यात यावे, असे आदेश पुणे सत्र न्यायालयाने दिले आहेत.

शनिवारी दुपारी तेलतुंबडे यांना पुणे न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान, न्यायालयाने या कारवाईवरुन पोलिसांना फटकारले. सुप्रीम कोर्टाने तेलतुंबडे यांना चार आठवड्यांची मुदत दिली होती. त्यामुळे पुणे पोलिसांनी केलेली कारवाई बेकायदेशीर आहे, असे मत न्यायालयाने नोंदवले. न्यायालयाने तेलतुंबडे यांची तातडीने सुटका करण्याचे आदेशही दिले आहेत.

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात गुन्हे रद्द करण्यात यावेत, या मागणीची तेलतुंबडे यांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली होती. त्यांना अटकपूर्व जामिनासाठी 11 फेब्रुवारीपर्यंत अवधी देण्यात आला होता. शुक्रवारी त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर शुक्रवारी रात्री त्यांना अटक करण्यात आली होती.