नक्षलवाद्यांशी संबंध : पुणे पोलिसांनी आवळल्या तेलतुंबडेच्या मुसक्या

मुंबई : नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून डॉ. आनंद तेलतुंबडेला आज पुणे पोलिसांनी मुंबईतून अटक केली. पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास मुंबई विमानतळावरुन तेलतुंबडेला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याची विलेपार्ले पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात आली. काल पुणे न्यायलयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.

आनंद तेलतुंबडेवर भीमा कोरेगाव हिंसाचार आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोप आहे. मुंबई विमानतळावर उतरताच पुणे पोलिसांकडून तेलतुंबडेला बेड्या ठोकण्यात आल्या. तसेच पुणे पोलीस तेलतुंबडेला पुण्याला घेऊन गेले असून, आज न्यायालयात हजर करून त्याच्या कोठडीची मागणी करणार आहेत.

पुणे न्यायालयाने अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळत त्यांना दिलासा देण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्यांनी जामिनासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज केला होता. सुप्रीम कोर्टाने त्यांना चार आठवड्यांसाठी अटकेपासून अंतरिम संरक्षण दिलं होतं. 21 डिसेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने आनंद तेलतुंबडेचा एफआयआर रद्द करण्याची मागणी फेटाळली होती. शिवाय अटकेपासून तीन आठवड्यांसाठी संरक्षण दिलं होतं. यानंतर आनंद तेलतुंबडेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. पण तिथेही त्याला दिलासा मिळाला नाही.