प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांची राजकारणात एंट्री

blank

टीम महाराष्ट्र देशा:- लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर राज्यात सर्वत्र विधानसभेचे वारे वाहत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यात मोठी उलथापालथ होत आहे. अनेक नेते पक्षांतर करत आहेत. अशातच आत्ता आपल्या आवाजाने लोकांना भूरळ घालणारा सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी राजकारणात प्रवेश केल्याचे त्यांनी स्वत: जाहीर केले आहे. सोलापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली आहे.

गायक आनंद शिंदे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी स्वीकारली आहे.यावेळी त्यांनी आरपीआय नेत्यांनी आजवर कलाकारांचा फक्त वापर केल्याची टीका आनंद शिंदेनी यावेळी केली.सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ व सोलापूर शहर मध्य हे मतदारसंघ राखीव आहेत.त्यामुळे आनंद शिंदे आगामी विधानसभा निवडणूक येथून लढवणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान आनंद शिंदे आणि त्यांचा मुलगा डॉ. उत्कर्ष शिंदे यांनी शिवसेनेतून विधानसभा निवडणूक लढवावी यासाठी शिवसेनेने जोरदार प्रयत्न केले होते. उद्धव ठाकरे यांनी शिंदे पिता-पुत्राला विधानसभेची ऑफर दिली असून आठवड्याभरापूर्वी मातोश्रीवर याबाबत बैठक झाल्याची माहिती होती. मात्र या बैठकीत आनंद शिंदे यांनी आपल्याला निवडणूक लढवण्यात रस नसल्याचे स्पष्ट केले होते.