एसटीच्या वाहकांना लिपिक होण्याची संधी

maharashtra ST

एस.टी. महामंडळातर्फे होणार्‍या लिपिक-टंकलेखकपदाच्या भरती प्रक्रियेमध्ये एस.टी.च्या वाहकांना अर्ज भरण्याची संधी देण्याचा निर्णय महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी घेतला आहे. गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा फायदा सध्या वाहक म्हणून काम करणार्‍या पदवीधरांना तसेच महिला वाहकांना होणार आहे.

जानेवारी महिन्यापासून एस.टी. महामंडळामध्ये १४ हजार जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. चालक-वाहक भरतीसाठी मागील महिन्यात परीक्षा घेण्यात आल्या. आता राज्यात २२००लिपिक-टंकलेखकांच्या पदाकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत. मात्र या पदांकरिता निघालेल्या परिपत्रकात वाहकांचा समावेश नव्हता.

काल (दि. २४ ऑगस्ट) झालेल्या बैठकीत महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी वाहकांना काही अटींवर लिपिक-टंकलेखकपदावर पदोन्नतीची संधी देण्यासाठी भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. त्यानुसार एस.टी. प्रशासनाने सुधारित परिपत्रक काढले आहे. एस.टी.तील पात्र वाहकांना विहित नमुन्यात अर्ज सादर करण्यासाठी १३ सप्टेंबर २०१७ पर्यंत मुदत आहे. इतर उमेदवारांच्या ऑनलाइन परीक्षेचेवेळी वाहक उमेदवारांचीही परीक्षा घेण्यात येणार आहे. पदवीधर वाहकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन एस.टी. प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.