शेतकऱ्यांसाठी शाश्वत विजेचा पर्याय, मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना

टीम महाराष्ट्र देशा : कृषिपंपांना पारंपरिक पद्घतीने वीजपुरवठा करण्यासाठी 63 केव्हीए/ 100 केव्हीए क्षमतेचे विद्युत रोहित्र उभारण्यात येतात व त्यावरील लघुदाब वाहिनीद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो. परंतु वीजचोरी, इतर तांत्रिक बिघाड, विद्युत अपघात, रात्रीच्या वेळी वन्यप्राण्यांचा धोका यासारख्या अनेक अडचणी निर्माण होतात. दुर्गम किंवा डोंगराळ भागात वीजयंत्रणेचे जाळे नाही तेथे डिझेल इंधनाचा वापर करून कृषिपंप चालविले जातात. या सर्वांसाठी पर्याय म्हणून दिवसा तसेच अखंडित व शाश्वत वीजपुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना जाहीर केली आहे.

सौर कृषिपंप – सौर कृषिपंप हा सूर्याच्या किरणांपासून म्हणजेच सौर ऊर्जेपासून चालणारा पंप आहे. सौर पंपामध्ये मुख्यतः सोलर पॅनल, वॉटर पंप संच, पंप नियंत्रण उपकरणे तसेच इतर आवश्यक साहित्याचा समावेश आहे. सौर पंपाद्वारे विहिर, नदी, शेततळे, कालव्यामधून पाण्याचा उपसा करून पाईपद्वारे पिकांना पाणी देता येते. सौर कृषिपंप सौर ऊर्जेवर म्हणजेच सूर्याच्या किरणांपासून काम करतो. जेव्हा सूर्यकिरणे पंपाच्या सोलर पॅनल्सवर पडतात तेव्हा डीसी (डायरेक्ट करंट) शक्ती निर्माण होऊन सौर पंप कार्यान्वित होतो व पाण्याचा उपसा केला जाऊ शकतो. सौर ऊर्जेमुळे शेतकऱ्यांना दिवसा पाण्याचा उपसा करता येतो.

Loading...

सौर कृषिपंपाची उपयुक्तता – सौर कृषिपंप चालविण्यासाठी कोणत्याही इंधन किंवा पारंपरिक विजेची आवश्यकता नाही. यामुळे वीजपुरवठा खंडित होणे, कमी दाब, सिंगल फेज समस्या, पंप जळणे या समस्याही उद्भवत नाहीत. दुर्गम डोंगराळ भागात जेथे वीजखांब रोवणे कठीण आहे तेथे हे सौर कृषिपंप लावणे सहजशक्य आहे. डिझेल पंपाच्या तुलनेत दिर्घकाळ म्हणजे 25 वर्ष टिकणाऱ्या सौर कृषिपंपाचा देखभाल खर्च अत्यंत कमी आहे. लुब्रिकेंट किंवा ऑईलची आवश्यकता नसते. त्यामुळे माती व पाणी दूषित होत नाही. सौर कृषिपंप चालविण्यास अतिशय सोपा व फायदेशीर आहे.

सौर कृषिपंपाचे फायदे – शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करता येणार आहे. विजेचा किंवा डिझेलचा वापर नसल्यामुळे वीजबिलांचा किंवा डिझेलचा खर्च नाही. कमीतकमी व साध्या देखभालीची गरज आहे. विद्युत अपघात होण्याची शक्यता नाही. पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होणार आहे. याशिवाय बॅटरी चार्जिंगची सोय असल्याने बॅटरीद्वारे शेतामधील घराला रात्रीच्या वेळी वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे.

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना – ज्यांच्याकडे शाश्वत जलस्त्रोत आहे व सिंचनासाठी पारंपरिक पद्घतीने वीजपुरवठा नाही अशा शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना राबविण्यात येत आहे. तसेच महावितरणकडे कोटेशनची रक्कम भरून कृषिपंपाची वीजजोडणी प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्याने सौर कृषिपंप उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

योजनेसाठी अर्ज करण्याची पद्घत – सौर कृषिपंप योजनेसाठी महावितरणतर्फे स्वतंत्र वेब पोर्टल सुरु केले आहे. www.mahadiscom.in या वेबसाईटवर किंवा https://www.mahadiscom.in/solar/ या लिंकवर जाऊन अर्जदार ए-वन अर्ज ऑनलाईन भरायचा आहे. हा अर्ज साधा व सोपा असून अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करता येतात. ऑनलाईन अर्ज करण्यास अडचण आल्यास शेतकऱ्यांना महावितरणच्या उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधता येईल व या कार्यालयातून अर्ज दाखल करण्यासाठी विनामूल्य मदत केली जाईल.

अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे – या योजनेसाठी शेतीचा 7/12 उतारा, जातीचे प्रमाणपत्र (अनुसूचित जाती/जमाती लाभार्थ्यांकरिता) या कागदपत्रांची सत्यप्रत आवश्यक आहे. अर्जदार स्वतः शेतजमिनीचा एकटा मालक नसेल, तर इतर हिस्सेदारांचा / मालकाचा ना हरकत दाखला देणे बंधनकारक आहे. पाण्याचा स्त्रोत डार्कझोनमध्ये असल्यास भूजल सर्वेक्षण विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. या व्यतिरिक्त संपर्काकरिता अर्जदारांचा मोबाईल क्रमांक, ईमेल पत्ता (असल्यास), पाण्याचे स्त्रोत व त्याच्या खोलीची माहिती अर्जामध्ये भरणे आवश्यक आहे. अर्ज केल्यानंतर संबंधीत अर्जदारांना त्यांनी नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे अर्जांची सद्यस्थितीबाबत माहिती कळविण्यात येणार आहे.

योजनेतील लाभार्थी हिस्सा – या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांकडून 3 अश्वशक्ती डीसी पंपाच्या आधारभूत किंमतीच्या 10 टक्के रक्कम आणि अनुसूचित जाती / जमातीच्या लाभार्थ्यांना पंपाच्या आधारभूत किंमतीच्या 5 टक्के रक्कम भरावी लागेल. पारंपरिक वीजपुरवठ्यासाठी रकमेचा भरणा करून प्रलंबित यादीत असलेल्या संबंधीत लाभार्थ्यांची रक्कम यामध्ये समायोजित करण्यात येईल व त्यांना उर्वरित फरकाची रक्कम भरावयाची आहे. सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांना 3 अश्वशक्तीसाठी 25,500 रुपये तर 5 अश्वशक्तीसाठी 38,500 रुपये आणि अनुसूचित जाती / जमाती लाभार्थ्यांना 3 अश्वशक्तीसाठी 12,750 रुपये 5 अश्वशक्तीसाठी 19,250 रुपये भरावे लागणार आहे.

पारंपरिक वीजजोडणीपेक्षा लाभार्थी हिस्सा अधिक का? – कृषिपंपाच्या पारंपरिक वीजजोडणीसाठी सुमारे 5500 रुपये भरल्यानंतर शेतकऱ्यांना 3 किंवा 5 अश्वशक्ती क्षमतेचे कृषिपंप व त्यासाठी लागणारे साहित्य उदा. पाईप, फिटींग स्वखर्चाने लावावे लागते. यासह विद्युत वायरिंग, स्टार्टर, ईएलसीबी, कॅपॅसिटर आदींसाठी एकूण सुमारे 25,000 ते 30,000 रुपयांचा खर्च येतो. याउलट सौर कृषिपंप, सौर पॅनल, पंप कंट्रोलर, पाईप इत्यादींचा अंतर्भाव आहे. तसेच 2 एलईडी बल्ब देण्यात येणार आहे. यासह मोबाईल चार्जिंग व बॅटरी चार्जिंगसाठी सॉकेटची सोय उपलब्ध आहे. इतर आणखी फायद्यांमुळे पारंपरिक वीजजोडणीच्या तुलनेत सौर कृषिपंप हा अत्यंत किफायतशीर आहे.

विमा संरक्षण व दुरुस्तीचा हमी कालावधी – सौर कृषिपंप 25 वर्ष सेवा देऊ शकतो. या कृषिपंपाच्या देखभाल व दुरूस्तीसाठी 5 वर्ष तर सौर पॅनलसाठी 10 वर्षांचा हमी कालावधी राहणार आहे. या हमी कालावधीत सौर कृषिपंप किंवा सौर पॅनल नादुरूस्त झाल्यास विनामुल्य दुरुस्ती करण्याची जबाबदारी एजन्सीची राहणार आहे. सौर कृषिपंप किंवा सौर पॅनल नादुरुस्त झाल्यास संबंधीत शेतकऱ्यांनी महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक तक्रार सेवा केंद्राला तात्काळ कळविणे आवश्यक आहे. तीन दिवसांमध्ये तक्रारीचे निवारण करण्यात येईल.

सौर कृषिपंपाच्या साहित्याची चोरी झाल्यास त्याची तक्रार नजीकच्या पोलीस ठाण्यात प्रथम खबरी अहवालाद्वारे (एफआयआर) दाखल करावी. त्याची माहिती महावितरण कार्यालयास देण्यात यावी. सौर कृषिपंप आस्थापित करणाऱ्या एजन्सीद्वारे 5 वर्षाच्या कालावधीसाठी पंपाचा विमा काढण्यात येत आहे. त्यामुळे विमा कंपनीकडून संबंधीत लाभार्थ्यांना नुकसान भरपाई मिळेल व सौर पंप आस्थापित करणारी एजन्सी त्यासाठी सहकार्य करेल.

नैसर्गिक आपत्तीपासून सुरक्षा – सध्या बाजारात उपलब्ध असलेले सोलर पॅनल हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने तयार केलेले आहेत. त्यामुळे वीज, वादळ, गारा या नैसर्गिक आपत्तीमुळे त्याचे क्वचितच नुकसान होते. एखाद्या दुर्मिळ वेळी वीज पडल्यामुळे सौर पॅनलचे नुकसान होऊ शकते. हा धोका टाळण्यासाठी सौर पंपासोबत वीज संरक्षण यंत्र (Lighting Arrestor ) बसविण्यात येणार आहे.

तक्रार निवारणासाठी 24×7 टोल फ्री सेवा – सौर कृषिपंप नादुरुस्त झाल्यास किंवा त्यासंबंधीची अन्य काही तक्रार असल्यास शेतकऱ्यांना महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक तक्रार सेवा केंद्राशी 24×7 संपर्क साधता येईल. यासाठी 1912 किंवा 18001023435 किंवा 18002333435 हे तीन टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहेत. प्राप्त झालेली तक्रार संबंधित एजन्सीकडे पाठविण्यात येईल व एजन्सीकडून तीन दिवसांत तक्रारीचे निवारण करण्यात येईल.

लेखक – निशिकांत राऊत, जनसंपर्क अधिकारी, महावितरण, पुणे

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार !!!
राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी यापुढे पाळणार नाहीत
शिवसेनेबाबतच्या 'त्या' वक्तव्यामुळे टीकेचे धनी झालेले चव्हाण आता म्हणतात...
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'
दिल्लीत मोठ्या थाटात प्रचाराला गेलेल्या तावडेंना केजारीवालांनी बेक्कार झापलं
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
उदयनराजे भोसले यांची निर्दोष मुक्तता