गाईंचे रक्षण आणि जनावरांच्या संवर्धनासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याचे आवाहन

amar-sable

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील भटक्या गाईंचे रक्षण आणि जनावरांच्या संवर्धनासाठी महापालिका, लोकप्रतिनिधी आणि पोलीस प्रशासनाने पुढाकार घेण्याचे आवाहन राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी केले आहे. तसेच गोहत्येसारख्या घटनांनी समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणा-या दुषप्रवृत्तींवर कायद्याची जरब बसवून त्यांच्यावर आळा घालण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.शहरात मागील आठ दिवसांच्या कालावधीत सांगवी आणि भोसरी परिसरात अज्ञात समाजकंटकांनी दोन गाईंची कत्तल केल्याच्या निंदनीय घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार अमर साबळे यांनी आज भोसरी पोलीस स्टेशनला भेट दिली. या घृणास्पद घटनेतील नराधम समाजकंटकांना तातडीने अटक करून त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप कुलकर्णी यांच्याकडे केली. यावेळी नगरसेवक विलास मडेगिरी, संभाजी फुगे, सुभाष सरोदे, विजय शिनकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप कुलकर्णी यांनी संबंधित समाजकंटकांविरोधात कलम 5, 5 अ आणि 5 ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. तसेच या घटनेतील आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी खासदार साबळे यांना दिले