आमदार राम कदमांचा महिला आयोगापुढेही माफीनामा

टीम महाराष्ट्र देशा – महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यप्रकरणी आमदार राम कदम यांनी राज्य महिला आयोगाकडे खुलासा सादर केला आहे. त्यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत आयोगापुढे बिनशर्त माफी मागितली आहे. भविष्यात महिलांचा सन्मान वाढविण्यासाठी कार्यरत राहण्याची हमीही त्यांनी आयोगाला दिली आहे.

दहीहंडीच्या कार्यक्रमात बोलताना आमदार कदम यांनी वादग्रस्त वक्तव्ये केली होती. त्याची स्वतःहून (स्यू मोटो) दखल घेऊन आयोगाने त्यांना 5 सप्टेंबर रोजी आपले म्हणणे आठ दिवसांत सादर करण्याचे बजावले होते. त्यानुसार आमदार कदम यांनी आयोगाकडे लेखी खुलासा सादर केला असून आयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महिलांची बिनशर्त माफी मागितली आहे.या खुलाशावर कायदेशीर सल्ला घेऊन योग्य ती कार्यवाही करु, अशी माहिती महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली.