‘अमृता वहिनी दोन्हींकडून ढोलकी वाजवतात, त्यांनी त्यांच्या गाण्याकडे लक्ष द्यावे!’

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर राज्यातील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आलेत. राज्य सरकारने कोरोना संसर्गाचे प्रमाणात कमी झालेल्या जिल्ह्यांना ही सूट दिली आहे. तर ११ जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. यात पुणे शहर आणि जिल्ह्याचाही समावेश आहे. यामुळे सरकारविरोधात नाराजी व्यक्त होत आहे. सरकारने मुंबईतील निर्बंध शिथिल केलेले असताना पुण्यात का कायम ठेवले? असा सवाल विचारला जात आहे. या मुद्द्यावरून अमृता फडणवीस यांनी पुणेकरांना धरणे आंदोलन करण्याचा सल्ला दिला आहे.

पुण्यातील एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की, पुण्यात कोरोनाचा दर चार टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळं इथं सगळं काही सुरळीत होण्याची गरज आहे. असं असताना शहरावर अजूनही बंधनं का आहेत, मला कळत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘कोरोना वाढला की घरात बसा म्हणायचे. अन् कोरोना आटोक्यात आल्यावर बाहेर फिरा म्हणून सांगायचे. अमृता फडणवीस या दोन्हींकडून ढोलकी वाजवत असतात. पुणेकरांनी काय करावं आणि काय करू नये हे सांगण्यापेक्षा अमृता वहिनींनी आपल्या गाण्याच्या छंदाकडे लक्ष द्यावे’ असा टोला चाकणकर यांनी लगावला आहे.

शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीगी अमृता फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘कोण अमृता फडणवीस? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी का? नावडतीचं मिठ अळणी अशी त्यांची अवस्था झाली आहे,’ असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे. पुढे पेडणेकर यांनी, आपल्याला त्यांच्याबद्दल जास्ती बोलायचं नाही असं म्हणत अधिक बोलणं टाळलं.

महत्त्वाच्या बातम्या