‘आझादी का अमृत महोत्सव’; लोक चळवळीतून पालटणार औरंगाबादचे रुप!

aurangabad

औरंगाबाद : भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने केंद्र शासन आणि राज्य शासनातर्फे ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने २६ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. लोक चळवळीतून शहराचे रूप पालटणार आहे. या महोत्सवात ‘स्वच्छ भारत मिशन’ अभियानाअंतर्गत ‘स्वच्छता’ हा विषय केंद्रस्थानी ठेवून विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

१ सप्टेंबरला झालेल्या विभाग प्रमुख आणि स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरीकरणाच्या निमित्ताने शासनाने दिलेल्या निर्देशानुसार २६ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत घेण्यात येणाऱ्या उपक्रमांविषयी चर्चा करण्यात आली. यामध्ये उपक्रमाच्या स्वरूपानुसार त्याची मांडणी, नियोजन करण्यासाठी विविध अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. २ ऑक्टोबर रोजी या महोत्सवाच्या निमित्ताने सायकल रॅली आणि फ्रिडम वॉकचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

या कामांचा समावेश

शहरातील कॅनॉट परिसरात स्ट्रीट फॉर पीपल, सेंट्रल नाका ते एमजीएम, सलीम अली सरोवर ते टीव्ही सेंटर रोडवर सायकलिंग ट्रॅकची निर्मिती, खाम नदी पुनरूज्जीवन प्रकल्प अंतर्गत खाम नदी परिसरात खेळाचे मैदान बनवणे, वृक्षारोपण करणे, नदी काठावर स्ट्रीट लाईट बसवणे. पेंट युवर सिटी अंतर्गत खाम नदीकाठी वसलेल्या घरांच्या बाहेरील भिंती रंगवणे, महानगरपालिकेच्या जलकुंभाची रंगरंगोटी करणे. पेंट युवर स्ट्रीट अंतर्गत शहरातील रस्ते आणि चौक येथे रंगरंगोटी करणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर आणि घाटी रुग्णालय परिसरातील रस्त्यांची रंगरंगोटी करणे.

महत्त्वाच्या बातम्या