शेतकरी बांधवांनी शेतीविषयक तंत्रज्ञान आत्मसात करावे -पालकमंत्री प्रविण पोटे

अमरावती : शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेऊन व शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात केल्यास शेतकरी बांधव नक्कीच यशस्वी होतील, असा विश्वास पालकमंत्री प्रविण पोटे यांनी व्यक्त केला. भारतीय कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्ली पुरस्कृत व श्रमसाफल्य फाऊंडेशन, अमरावती द्वारा संचालित घातखेड येथील कृषि विज्ञान केंद्रात आयोजित रब्बी शेतकरी मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
पालकमंत्री प्रविण पोटे यांनी आजच्या महिलांनी पुरूषांच्या बरोबरीने शेती करावी व शेतकरी बांधवांचे मनोधैर्य वाढवावे असे सांगून,  महिलादेखील यशस्वी शेतकरी व्हाव्या अशी इच्छा व्यक्त केली.
खासदार आंनदराव अडसूळ यांनी मार्गदर्शन करतांना शेती हे एक शास्त्र असल्याचे सांगितले. तसेच जिल्ह्यात पांदण रस्त्यांच्या योजनेमध्ये शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले त्यामुळे ही योजना यशस्वी झाली. शेतकऱ्यांच्या दृष्टिने कृषि विज्ञान केंद्राची महत्वाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. वसुधाताई देशमुख यांनी उपस्थित नागरिकांना शेतीविषयक मार्गदर्शन केले.