राज ठाकरेंच्या भेटीनंतर खा. अमोल कोल्हेंनी दिले स्पष्टीकरण

टीम महाराष्ट्र देशा : शिरूरचे नवनिर्वाचित खा. अमोल कोल्हे हे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला गेले होते. या कोल्हे ठाकरेंच्या भेटीकडे अनेकांचे लक्ष लागले होते. तर या भेटीनंतर खा. अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी अनेक ठिकाणी सभा घेतल्या. त्यांच्या सभांचा सकारात्मक परिणाम झाला. त्यामुळेच मी राज ठाकरेंचे आभार मानण्यासाठी कृष्णकुंजवर आलो होतो. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असे डॉ. अमोल कोल्हेंनी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रत्यक्ष निवडणुकीत न उतरता भाजप विरोधी प्रचाराचा धडाका लावला होता. या प्रचार सभांमधून राज ठाकरे यांनी ऑडिओ-व्हिजुअलसचा वापर करत भाजपच्या खोट्या विकासाचा बुरखा फाडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राज ठाकरे यांच्या या भाजप विरोधी भूमिकेचा फायदा कॉंग्रेस आघाडीला काही मतदारसंघामध्ये होताना दिसला.

दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस आघाडीचे अनेक नेते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला गेले होते. त्यामुळे खा. अमोल कोल्हे यांची राज ठाकरे यांच्या बरोबरची भेट ही देखील विधान सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असेल असा अंदाज अनेकांनी वर्तवला होता. मात्र खा. कोल्हे यांनी भेटीच स्पष्टीकरण देत अनेक प्रश्नांना पूर्णविराम दिला आहे.