fbpx

रयतेचे राज्य आणण्यासाठी हे सरकार उलथून टाका : अमोल कोल्हे

टीम महाराष्ट्र देशा :  छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत होते ते रयतेचे राज्य आणण्यासाठी हे सरकार उलथून टाकले पाहिजे असे आवाहन राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले आहे. ते शिवस्वराज्य यात्रेनिमित्त जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

भोकरदन येथील सभेला उद्देशून बोलताना अमोल कोल्हे यांनी १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यावेळी प्रश्न विचारावासा वाटतो कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा… राज्याराज्यात बेरोजगारीचे तांडे पाहायला मिळत आहे. ४४ लाख लोकांचे पाच वर्षांत रोजगार गेला आहे आणि अशावेळी मुख्यमंत्री महाजनादेश यात्रा काढत आहेत. मतांचे राजकारण करत ही महाजनादेश यात्रा काढली जात आहे असा आरोपही अमोल कोल्हे यांनी केला.

पुढे बोलताना कोल्हे यांनी वाळू जेवढी हातात घट्ट पकडून ठेवली तरी ती सरकून जाते त्यामुळे आजची गर्दी पाहिली तर त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याशिवाय राहणार नाही असंही कोल्हे म्हणाले. तसेच गाजरापासून सावधान रहा निवडणूकीत अशी अनेक गाजरं येतील त्यामुळे अशी गाजरं दाखवणारं सरकार घालवल्याशिवाय रयतेचे राज्य येणार नाही असे आवाहनही अमोल कोल्हे यांनी केले.

दरम्यान, पुढे बोलताना कार्यकर्ता नावाची वीट मजबुत आहे. तोपर्यंत भिंत मजबुत राहते. त्यामुळे कोण गेले त्याचा विचार करु नका. कार्यकर्ता जोपर्यंत आहे तोपर्यंत पक्ष टिकून राहणार आहे असेही अमोल कोल्हे म्हणाले.