दुष्काळाचा शेष जातोय कुठे, अमोल कोल्हे सरकारवर बरसले

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या चार वर्ष दुष्काळाचा शेष सरकार गोळा करतेय मग हा गोळा केला जाणारा शेष जातोय कुठे याचा उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे असे आव्हान खा. डॉ.अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले आहे. आज जिंतूर येथे शिवस्वराज्य यात्रेची जाहीर सभा पार पडली. यावेळी अमोल कोल्हे यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली.तर विमा कंपन्यांच्या भोंगळ कारभारवरून सरकारला वेठीस धरले.

१६ हजार कोटी रुपयांचा विमा कंपन्याचा फायदा झाला आहे. तुमच्या माझ्या शेतकऱ्यांच्या शेतीला नुकसानभरपाई मिळावी म्हणून विमा भरला जातो परंतु त्यांना हा पीक विमा मिळत नाहीय. जलयुक्त शिवार ही महत्वाकांक्षी योजना होती तर पाणी कुठे मुरलंय हेही जनतेला सांगावं असा जाब डॉ. अमोल कोल्हे यांनी विचारला.

गेल्या निवडणुकीला भाजप पक्ष विचारत होत कुठं नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा. मात्र आता त्यांच्याच काळात महाराष्ट्राची अवस्था बिकट झाली आहे. १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. रोज माता भगिनींच्या कपाळावरचे कुंकू पुसले जात आहे. शेतकरी हाल्पेष्टा सहन करत आहे. तरी देखील हे सरकार पुन्हा निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त करत आहे, असेही कोल्हे यावेळी म्हणाले.