fbpx

सत्ता आल्यानंतर यात्रा काढायची होती; आदित्य ठाकरेंवर अमोल कोल्हेंची टीका

टीम महाराष्ट्र देशा : शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर जनाशिर्वाद यात्रेवरून टीका केली आहे. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विधानसभेपूर्वी यात्रा काढण्याऐवजी सत्तेत आल्यावर काढायला हवी होती असा टोला अमोल कोल्हेंनी लगावला आहे.

अमोल कोल्हे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी बारामतीत आले होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ‘आदित्य ठाकरे यांनी ऐन विधानसभेच्या तोंडावर ही यात्रा काढली आहे. त्याऐवजी त्यांनी सत्तेत आल्यानंतर ही यात्रा काढली असती तर त्यांना काम कसं करावं हे समजलं असतं. मध्यंतरी काढली असती तर कामांचं मूल्यांकन करता आलं असतं’, असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, पक्षांतराविषयी बोलताना ‘अनेक भाजप नेते आघाडीचे आमदार संपर्कात असल्याच्या वावड्या उठवतात. प्रत्यक्षात मात्र नावं जाहीर करत नाहीत. २०१४ मध्ये कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र असं विचारणाऱ्यांना आरशात उभे राहिल्यावर स्वतःलाच आपण कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र असं विचारण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पवारसाहेब आणि आजितदादांच्या नेतृत्वावरील विश्वासामुळे कोणीही पक्षांतर करणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.