fbpx

अमित शहांच्या भेटीगाठींवर राज ठाकरेंचा जोरदार निशाणा!

amit shaha vr raj

मुंबई: ‘संपर्क फॉर समर्थन’च्या माध्यमातून अमित शहा प्रसिध्द व्यक्तींच्या भेटी घेत आहेत. ‘संपर्क फॉर समर्थन’ या मोहिमेअंतर्गत ते विविध मान्यवरांच्या भेटी घेत असून त्यांना भाजपचं काम समजावून सांगत आहेत. तसेच भविष्यात भाजपला समर्थन देण्याची विनंती करत आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वीच या मोहिमेअंतर्गत क्रिकेटर कपिल देव यांची देखील भेट घेतली होती.

शहांच्या याच भेटीगाठींवर मनसेप्रमुख राज ठाकरेंनी व्यंगचित्राच्या माध्यमातून जोरदार निशाणा साधला आहे. ज्या व्यक्तींना भेटायचं आहे, त्यांची एक बकेट लिस्ट अमित शहांच्या हातात आहे, असं व्यंगचित्र राज ठाकरेंनी रेखाटलं आहे. ‘बकेट लिस्ट?’ शहा बकेट लिस्ट पाहण्यात व्यस्त असल्यानं भाजपा कार्यकर्त्याकडे त्याचं दुर्लक्ष झालं आहे, असं दाखवण्याचा प्रयत्न राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून केला आहे.

भाजपकडून लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु असून, याचाच एक भाग म्हणून, आता पक्षाकडून ‘संपर्क फॉर समर्थन’ अभियान हाती घेण्यात आलं आहे. या अभियानांतर्गत आज अमित शाह यांनी माधुरी दिक्षित यांची भेट घेतली आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, रावसाहेब दानवे उपस्थित होते.

मुंबईत अमित शहा उद्धव ठाकरे यांच्यासह रतन टाटा, लता मंगेशकर, यांची भेट घेणार आहेत. यापूर्वी शहा यांनी आधीच बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार यांची भेट घेतली होती. गुरुवारी ते अकाली दलाच्या नेत्यांना भेटणार आहेत.