आमचा हिशोब मागण्यापेक्षा तुमच्या चार पिढ्यांचा हिशोब द्या – अमित शहा

टीम महाराष्ट्र देशा – छत्तीसगडमध्ये वर्षअखेरीस विधानसभा निवडणूक होत आहे. निवडणुकीच्या प्रचाराची अनौपचारिक सुरुवात अमित शहा यांनी रविवारी केली. अंबिकापूर येथे झालेल्या जाहीर सभेत शहा यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. शहा म्हणाले की, भाजपने केलेल्या विकासकामांचा हिशेब मागण्याआधी राहुल गांधी यांनी आत्मपरीक्षण करायला हवे. तुमच्या कुटुंबातील ४ पिढ्यांनी देशावर ५५ वर्षे राज्य केले. मग तरीही विकास का झाला नाही? याचे उत्तर राहुल यांनी आधी द्यायला हवे. मोदी सरकारने दर पंधरवड्याला गरीब, शेतकरी आणि मागासांसाठी नवीन योजना सुरू केल्या.

उन्हाळा सुरू झाला की राहुल गांधी सुट्टीसाठी युरोप आणि इटलीत जातात. राहुल जेव्हा येथे मते मागण्यासाठी येतील तेव्हा त्यांच्या पक्षाने विकास का केला नाही, असा प्रश्न तुम्ही विचारणार की नाही, असा प्रश्न अमित शहा यांनी उपस्थितांना विचारला.शहा म्हणाले की, काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात सीमेपलीकडून दररोज गोळीबार होत असे, पण त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले जात नसे. पण मोदी सरकारने २०१४ मध्ये सूत्रे हाती घेतल्यापासून ही स्थिती बदलली आहे. उरी येथे दहशतवादी हल्ल्यात १२ जवान ठार झाले. त्यांना प्रत्युत्तर देण्याची संधीही मिळाली नाही. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचा बदला घेण्यासाठी आपल्या जवानांना सर्जिकल स्ट्राइक करण्यासाठी पाकिस्तानमध्ये पाठवले.