शरद पवारांना प्रत्युत्तर देण्यास तयार रहा ; भाजपच्या सोशल मिडिया कार्यकर्त्यांना अमित शहांंचे आदेश

पुणे : ‘शेतक-यांच्या गोष्टी काय करता, तुमच्या काळात शेतक-यांच्या जेवढ्या आत्महत्या होत होत्या त्यात आता देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात 33 टक्के घट झाली आहे’. जर शरद पवार शेतक-यांच्या प्रश्नावर बोलत असतील तर त्यांना लगेच अशा प्रकारची प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी स्व:तला तयार ठेवले पाहिजे. असा सल्ला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. आज राज्यातील भाजपच्या सोशल मीडिया प्रतिनिधींचा मेळावा पुण्यामध्ये पार पडला यावेळी शहा यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांसाठी कानमंत्र दिला आहे.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, खासदार अनिल शिरोळे, महापौर मुक्ता टिळक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अमित शहा म्हणाले, कुठल्याही प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी माहिती असणे गरजेचे आहे. त्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या प्रत्येक योजनांची, भाजपच्या नेत्यांची भाषणं, त्यांचे ब्लॉग, पत्रकार परिषदा या सर्वांची माहिती घेतली ठेवली पाहिजे.