‘काश्मीरमधील हिंसेच्या वेळी अमित शहा गरबा खेळत होते’, रजनी पाटील यांची टीका

रजनी पाटील

नवी दिल्ली : लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराच्या घटनेवरुन सर्वच विरोधीपक्ष भाजपावर निशाना साधत आहेत. त्यावर भाजपाकडूनही प्रतिउत्तर दिले जात आहे. ‘लखीमपूर खेरी येथे भेट देणारे राहुल व प्रियंका गांधी काश्मीरला का जात नाहीत.’ असा सवाल भाजपने केला आहे. त्यावर काँग्रेसच्या जम्मू काश्मीर प्रभारी रजनी पाटील यांनी प्रतीउत्तर दिले आहे. जम्मू काश्मीरमधील हिंसाचारादरम्यान अमित शहा हे नवरात्रीचा गरबा खेळत होते. अशी टीका रजणी पाटील यांनी केली आहे.

यावेळी रजनी पाटील म्हणाल्या, हिंसाचारात पीडित कुटुंबीयांना मी राहुल गांधीच्या आदेशावरुनच भेटले आहे. पक्षाच्या कार्यक्रमासाठी भुवनेश्वरमध्ये असताना राहुल गांधींनी मला फोन करुन काश्मीरला जाण्यास सांगितले होते. जम्मू काश्मीरच्या प्रभारी म्हणून काँग्रेसच्या प्रतिनिधी या नात्याने मी पीडित कुटुंबियांचे सात्वन केले. जम्मू काश्मीरमध्ये हिंसा होत असताना अमित शहा हे नवरात्रीचा गरबा खेळत होते. त्यांना हा प्रश्न का विचारला जात नाही. असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

पुढे बोलताना रजनी पाटील म्हणाल्या, ‘काश्मीर खोरे पुन्हा अशांत होऊ लागले असून दहशतवाद्यांनी निष्पाप नागरिकांची केलेली हत्या मन विषण्ण करणारी आहे. कलम ३७० हटविल्यानंतर सारे काही सुरळीत असल्याचा दावा करणारे केंद्र सरकार आणि स्थानिक प्रशासनच या हिंसेला जबाबदार आहे, असा आरोप रजनी पाटील यांनी केला. रजनी पाटील यांनी दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या मख्खनलाल बिंद्रू आणि शिक्षिका सुपेंद्र कौर यांच्या कुटुंबीयांची श्रीनगरमध्ये, तर दिवंगत शिक्षक दीपकचंद यांच्या कुटुंबीयांची जम्मू येथे नुकतीच भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

कलम ३७० हटविल्यानंतर सारे सुरळीत असल्याचा दावा केंद्र सरकार करत आहे. असे असताना काश्मीरमध्ये असे भयाचे वातावरण निर्माण होणे, लोकांच्या मनात भयामुळे स्थलांतराची भावना निर्माण होणे हे केंद्र सरकारचे, गृह मंत्रालयाचे अपयश आहे. केंद्राने ही जबाबदारी स्वीकारायला हवी. लोकांना त्यांनी सुरक्षितता द्यावी, असेही रजनी पाटील म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या