VIDEO- अमित शहांचे राज्यसभेतील पहिले संपूर्ण भाषण

टीम महाराष्ट्र देशा: मोदींनी भजी विकून पैसे कमावण्याचा सल्ला दिला यावरुन काही लोकं टीका करतायंत. पण भजी विकणे ही लाजिरवाणी गोष्ट नाही. चहा विकणारा मुलगा देशाचा पंतप्रधान होऊ शकतो तर भजी विकणाराही मोठी व्यक्ती होऊ शकते. भविष्यात भजी विकणाऱ्याची तिसरी पिढी या देशातील सर्वात मोठे उद्योजकही असू शकतात, असे त्यांनी सांगितले. भजी तळण्यात गैर काही नाही. पण मेहनतीने पैसे कमावणाऱ्यांची तुलना भिकाऱ्यांशी करणे गैर आहे. अस म्हणत पकोड्याचा ठेला सुरू करून बेरोजगारांनी रोजगार मिळवावा या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विधानाची पाठराखण खासदार आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली आहे.  तर दुसरीकडे, ‘भजी विकूनच का होईना पण मेहनतीने पैसे कमावणऱ्यांची तुलना भिकाऱ्यांशी करणे योग्य नसल्याचे’ म्हणत अमित शहा यांनी काँग्रेस खासदार पी. चिदंबरम यांना चिमटा काढला.

‘देशात 55 वर्षे एकाच कुटूंबाने राज्य केले. 30 वर्षे देश अस्थिरतेच्या सावटात वावरत होता. पण 2014 मधील निवडणुकीत जनतेने सत्तांतर घडविले. देशात आता स्थिर सरकार असून भाजपने एनडीएतील घटकपक्षांच्या साथीने देशाला पुढे नेले’, असेही अमित शहा यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे. तसेच या भाषणातून शाह यांनी भाजप सरकार देशात राबवत असलेल्या विविध योजनांचा पाढा वाचला. ते म्हणाले, ‘प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. देशात 50 कोटींपेक्षा जास्त लोकांना 5 लाखांचा आरोग्य विमा देणारी योजना मोदी सरकारने आणली आहे. शौचालय बांधणी, मोफत गॅस कनेक्शन, शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान कृषी विमा योजना या सर्वांचा उल्लेख केला. लोकांना चांगले वाटतील यापेक्षा लोकांच्या हिताचे निर्णय आम्ही घेतो. गेल्या 55 वर्षात काँग्रेसला जमले नाही ते मोदी सरकारने करुन दाखविले आहे.’

अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सोमवारी राज्यसभेत चर्चा झाली. या चर्चेत अमित शहा यांनी सहभाग घेतला. राज्यसभेतील अमित शहांचे हे पहिलेच भाषण होते. या भाषणात शहा यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.