अमित शाह प्रथमच मातोश्री वर

amit-shah,-uddhav_0_0_0_0_0_0_0_0_0_0_0_0_0_0_0_0_0_0_0_0_0

मुंबई: सत्तेत असूनही भाजप शिवसेनेमध्ये असणारा कलगीतुरा सर्वश्रुत आहे. सरकारमधील दोन्ही पक्षाचे नेते कायम एकमेकावर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मात्र, आता राष्ट्रपती निवडणुकीवरून भाजप शिवसेनेशी सलगी वाढवताना दिसत आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा तीन दिवसाच्या मुंबई दौ-यावर येणार असून यावेळी ते शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेणार असल्याचे वृत्त एबीपी माझा या वृत्त वाहिनीने दिले आहे. शिवसेना सातत्याने सरकार विरोधी भूमिका घेऊन भाजपाची कोंडी करत असल्याने युतीच्या संबंधात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. त्यापार्श्वभूमीवर दोन्ही पक्षप्रमुखांची ही भेट होत असल्याची माहिती समोर आली आहे.

शिवसेना भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमध्ये सहभागी असली तरी, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाला साथ देण्याचे कोणतेही आश्वासन शिवसेनेने दिलेले नाही. आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपाला शिवसेनेच्या मदतीची गरज पडणार आहे. तेच या भेटीमागे खरे कारण  असल्याचे राजकीय जाणकरांनी सांगितले. शिवसेनेचा पाठिंबा महत्वाचा असल्याने भाजपा शिवसेनेला अजिबात दुखावू इच्छित नाही.