चून चून के मारो, नक्षल्यांविरोधात अमित शाह आक्रमक

टीम महाराष्ट्र देशा : देशाच्या गृहमंत्री पदी येताच अमित शाहांनी देशाअंतर्गत सुरक्षेबाबत कठोर निर्णय घेतले आहेत. त्यामुळे नक्षलवाद्यां विरोधात देखील अमित शाहांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये नक्षलवाद्यांच्या कारवाया वाढल्या असल्यामुळे त्या ठिकाणी नक्षलीविरोधी कारवाई अधिक करण्याचे आदेश गृहमंत्रालयाकडून देण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांविरोधात निर्णायक लढाई सुरू करण्यात येणार आहे. विविध राज्यांमधील नक्षलवादविरोधी कारवायांमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दल महत्त्वाची भूमिका निभावत असते. संबंधित राज्यातील पोलिसांच्या सहकार्याने त्या त्या ठिकाणी उग्र नक्षलवाद्यांविरोधात कारवाई केली जाते. त्यामुळे आता या निर्णायक लढाईत केंद्रीय राखीव पोलिस दल महत्त्वाची भूमिका निभावणार आहे.

दरम्यान मंगळवारी केंद्रीय गृह सचिव राजीव गौबा यांच्या नेतृत्त्वाखाली एक उच्चस्तरिय बैठक झाली. या बैठकीत देशातील नक्षलवादी कारवायांचा आढावा घेण्यात आला आणि पुढील रणनिती निश्चित करण्यात आली.