कुणाचा रंग भगवा, हिरवा, निळा असेल पण माझा फक्त तिरंगा – अमित देशमुख

amit deshmukh

टीम महाराष्ट्र देशा : आज कुणाचा भगवा, कुणाचा हिरवा तर कुणाचा निळा रंग आहे पण या तिन्ही रंगापासून तयार झालेला तिरंगा झेंडा माझा आहे असे मत माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केले. ‘विलास युवक महोत्सव २०१९’ उद्घाटन समारंभ सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. या युवक महोत्सवात सूत्रसंचलन करणाऱ्यांनी रंगाचा उल्लेख केला जो करण्याची गरज नव्हती असे म्हणत आज कुणाचा भगवा, कुणाचा हिरवा आणि कुणाचा निळा रंग आहे परंतु या तीन रंगापासून तयार होणारा तिरंगा झेंडा माझा आहे असे मत आमदार अमित विलासराव देशमुख यांनी यावेळी व्यक्त केले.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व कै.व्यंकटराव देशमुख महाविद्यालय बाभळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बाभळगाव या ठिकाणी चार दिवसीय विलास युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या आंतरमहाविद्यालयीन ‘विलास युवक महोत्सव २०१९’ चा उद्घाटन समारंभ सोहळ्याची सुरुवात शनिवार दिनांक २१ सप्टेंबर रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे कुलगुरू डॉ. उध्दव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रसिद्ध सिने अभिनेते नाट्य कलावंत राहुल सोलापूरकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत स्वामी रामानंद तीर्थ व लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.

दरम्यान, काँग्रेस पक्षाची पहिली यादी हाती लागल्याचा विविध वृत्तवाहिन्यातून दावा केला जात आहे. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिव व लातूर शहराचे विद्यमान आमदार अमित देशमुख यांचे काँग्रेसच्या पहिल्या यादीत नाव आहे. लातूर ग्रामीण मतदारसंघातून विद्यमान आमदार त्र्यंबक भिसे यांना डावलून विलासराव देशमुखांचे कनिष्ठ पुत्र व जिल्हा परिषद सदस्य धीरज देशमुख यांचेही नाव नक्की झाल्याची चर्चा माध्यमातून पुढे आली आहे.

पहिल्यांदाच राज्यात दोन सख्ख्या भावांना लगतच्या मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याचा पहिलाच प्रसंग असल्याची चर्चाही सुरू झाली आहे. विलासराव देशमुखांनी आपल्या हयातीत २००९ साली आपला राजकीय वारसा ज्येष्ठ सुपुत्र अमित देशमुख यांच्याकडे सुपूर्द केला. अमित देशमुख हे लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून तब्बल ९९ हजार मतांनी विजयी झाले होते. गेल्या तीन वर्षापासून लातूर ग्रामीण मतदारसंघात धीरज देशमुख हे उमेदवार राहतील अशी चर्चा सुरू होती. अनेक कार्यक्रमात आमदार त्र्यंबक भिसे यांच्या उपस्थितीतच कार्यकर्ते धीरज देशमुख यांचा उल्लेख भावी आमदार म्हणून करत असत.

महत्वाच्या बातम्या