धनगर आरक्षण मेळाव्यातून प्रकाश आंबेडकर साधणार संवाद

लातूर : वंचित बहुजन आघाडीतर्फे एमआयएम यांची आघाडी तुटल्यामूळे आता वंचितर्फे धनगर समाजाला जवळ करण्याचा प्रयत्न करीत आहेत. याच माध्यमातून लातूरात 25 सप्टेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे धनगर समाज बांधवांशी संवाद साधणार आहे.

धनगर समाजाला आरक्षणासंदर्भात वेगवेगळी आश्वासने सरकारने दिली; पण ती पूर्ण झाली नाहीत. या पार्श्वभूमीवर लातूरात धनगर आरक्षण मेळावा आणि सत्ता संपादन संकल्प मेळावा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि ऍड. अण्णाराव पाटील हे समाजबांधवांशी संवाद साधणार आहेत.

दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात बुधवारी (ता. 25) दुपारी एक वाजता हा मेळावा होणार आहे. मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी धनगर आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रात युतीची सत्ता आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये सोडवू, असे लेखी आश्वासन बारामतीमध्ये उपोषणकर्त्यांना दिले होते. त्यावर विश्वास ठेवून 2014 मध्ये महाराष्ट्रातील धनगर समाजाने भाजप-शिवसेनेला सत्तेत बसविले; पण सत्तास्थानी विराजमान झाल्यानंतर युतीच्या नेत्यांनी धनगर समाजाची फसवणूक केली. टोलवाटोलवी करून समाजाला झुलवत ठेवण्याचे काम केले गेले.