… म्हणून उमेदवारांच्या नावापुढं जात लावली, आंबेडकरांनी केलं लंगडंं समर्थन

प्रकाश आंबेडकर

मुंबई – वंचित बहुजन आघाडीच्या 37 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आल्यानंतर सर्वात जास्त चर्चा उमेदवार कोण आहे यापेक्षा नावासोबत जात छापण्यात आली त्याची सुरु आहे. या यादीतील सर्वच उमेदवारांच्या नावापुढे त्यांच्या समाजाचा उल्लेख केल्याने वंचित बहुजन आघाडी टीकेची धनी बनली आहे.

जातीव्यवस्था मोडून काढण्यासाठी समाजाच्या विविध घटकांकडून प्रयत्न होत असताना अश्या पद्धतीने जातींची जाहिरात केल्याने अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. विशेष म्हणजे चौफेर टीका होत असताना देखील निरनिराळ्या समाजातील लोकांना उमेदवारीची संधी देण्यात आली आहे .ही नवी पद्धत असून याने राजकारणाची दिशा बदलेल, असा अजब दावा देखील आंबेडकर यांनी केला आहे.

आघाडीकडून वंजारी, बौद्ध, धिवर, माना आदिवासी, माळी, बंजारा, धनगर, मुस्लिम, कैकाडी, मातंग, शिंपी, कोळी, विश्वकर्मा, वडार, होलार, कुणबी, लिंगायत, भिल्ल, वारली, मराठा, आगरी अशा बहुतांश समांजांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. यात सात डॉक्टर, तीन प्राध्यापक व दोन वकिलांचा समावेश आहे.

तसं पाहिलं तर सर्वच राजकीय पक्षांकडून जातीपातीचे राजकारण केले जाते मात्र जातीयवादाच्या जोखडातून मुक्तता व्हावी यासाठी ज्या डॉं.बाबासाहेब आंबेडकरांनी लढा दिला त्यांचा वारसा सांगणाऱ्या या आघाडीकडून अश्या जाती अधोरेखित केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शाळेच्या दाखल्यावरून देखील जात काढून टाकावी अशी भूमिका घेणे अपेक्षित असताना आंबेडकर यांनी घेतलेली भूमिका विचार करायला भाग पाडणारी आहे.