आंबेडकर यांच्या लंडन येथील स्मारकाचे काम लवकरच पूर्ण करणार – राजकुमार बडोले

Ambedkar London Memorial work complete soon - Rajkumar Badole

मुंबई : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन येथील घराच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे काम नियोजित वेळेत पूर्ण करुन लवकरच त्याचा लोकार्पण सोहळा करण्यात येईल, असे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे सांगितले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य केलेले लंडन येथील घर हे आंतरराष्ट्रीय स्मारक करण्याबाबत लंडन येथील सल्लागार समितीने सूचविलेल्या शिफारशींच्या अनुषंगाने सुरु असलेल्या कामकाजाच्या संदर्भात सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आज मंत्रालयात झाली त्यावेळी ते बोलत होते.

सामाजिक न्यायमंत्री श्री.बडोले म्हणाले, लंडन येथील सल्लागार समितीच्या बैठकीस मी उपस्थित होतो. समितीने सूचविलेल्या शिफारशींच्या अनुषंगाने स्मारकाचे कामकाज करण्यात येत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्या ठिकाणी राहत होते तेथे त्या काळातील सजावट करुन तो काळ निर्माण करावा. या ठिकाणी स्वतंत्र वाचनालय, योग्य ते सुशोभिकरण करुन आवश्यक ती सर्व कामे पूर्ण करुन या स्मारकाचा लोकार्पण सोहळा 26 नोव्हेंबर 2017 रोजी करण्याचे नियोजन करण्यात येईल,तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक कार्य, त्यांचे विचार आणि त्यांचे जीवन यावर आधारित जागतिक स्तरावरचे मासिक लंडन येथून प्रकाशित करण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या.

या लोकार्पण सोहळा या कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्याय विभाग, राज्यातील सामाजिक न्याय विभाग, बार्टी, समता प्रतिष्ठान यांचा सहभाग राहील, असे सांगून या कार्यक्रमासाठी देशातील अनुसूचित जाती, जमातीचे खासदार, राज्यातील लोकप्रतिनिधी, विविध विद्यापिठातील शैक्षणिक तज्ज्ञ यांना निमंत्रित करण्याबाबत नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

सार्वजनिक बांधकाम विभागाचा स्वतंत्र कक्ष स्थापन करावा सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारित असलेली वसतीगृहे, इमारती यांच्या दुरुस्ती व देखभाल तसेच नव्याने बांधकाम करण्यात येणाऱ्या वास्तूंची कामे त्वरित व्हावीत, संबंधित ठिकाणचे रस्ते यांची कामे नियोजित वेळेत पूर्ण व्हावी यासाठी सामाजिक न्याय विभागाकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाचा स्वतंत्र कक्ष स्थापन करावा, अशा सूचना श्री.बडोले यांनी यावेळी दिल्या. या बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, सह सचिव दिनेश डिंगळे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयचे वरिष्ठ सहाय्यक संचालक ज्ञानोबा इगवे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.