‘भाजपाला आतून मदत करण्याऐवजी डायरेक्ट मदत केल्यास आंबेडकरांनाही मंत्री होण्याची संधी’

पुणे : भाजपाला आतून मदत करण्याऐवजी डायरेक्ट मदत केल्यास आंबेडकरांनाही मंत्री होण्याची संधी मिळेल असं म्हणत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांना थेट ऑफर दिली आहे. महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीचा प्रयोग यशस्वी होणार नाही. याउलट तिसऱ्या आघाडीचा फायदा आम्हालाच होईल असा विश्वासदेखील आठवले यांनी व्यक्त केला.

पुण्यातील भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारासाठी पुण्यात आले असता आठवले पत्रकारांशी संवाद साधला. ‘‘प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी ही ‘किंचित आघाडी’ आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावर या आघाडीचा किंचितही परिणाम होणार नाही. या आघाडीचा एकही खासदार निवडून येणार नाही,’’ असे भाकित देखील आठवले यांनी वर्तवले आहे.

प्रकाश आंबेडकर सोलापूर आणि अकोला या दोन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. पण आंबेडकरांसह ‘वंचित’च्या सर्व उमेदवारांच्या पराभवाचा दावा आठवलेंनी केला आहे.मी सगळ्या आघाड्या करुन आलो आहे. महाराष्ट्रातली जनता तिसरी आघाडी मान्य करत नाही,’’ असे आठवले म्हणाले.

भाजप-शिवसेना युतीला घवघवीत यश मिळेल आणि केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन होईल. दलित समाज भाजपसोबत आहे. त्यामुळे यावेळी एनडीएचे सरकार पूर्ण बहुमताने सत्तेत येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान मोदींच्या विकासाची हवा आहे. यात बारामतीचा शरद पवारांचा बालेकिल्ला ढासळणारच, असा दावा देखील आठवले यांनी व्यक्त केला.