fbpx

कला, संस्कृती आणि पर्यटनाला उत्तेजन मिळण्यासाठी राजदूतांनी सहकार्य करावे : फडणवीस

मुंबई : महाराष्ट्रातील कला, संस्कृती आणि पर्यटनाला उत्तेजन मिळण्यासाठी राजदूतांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते बांद्रा येथील मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या संकुलात झालेल्या भारतीय राजदूतांच्या बैठकीत बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात उद्योग सुरु करण्यासाठी चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. येथील पारंपरिक कला, लोककलांना जगभर मान्यता मिळाली आहे. येथील पर्यटन स्थळे जगाचे लक्ष वेधून घेत आहेत. सण, उत्सव, पारंपरिक खेळ आणि खाद्य संस्कृतीने जगातील पर्यटकांना भुरळ घातली आहे. म्हणूनच महाराष्ट्राचे जास्तीत जास्त ब्रँडिंग आपण करावे. आपणच खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे राजदूत आहात. आपण खूप चांगले काम करीत आहात, शेवटी त्यांनी सर्व राजदूतांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या बैठकीत राजदूतांनी महाराष्ट्रात विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्यास उद्योगपती इच्छुक असल्याचे सांगून महाराष्ट्रातील कला, संस्कृती आणि पर्यटन स्थळांचे जास्त आकर्षण असल्याचे सांगितले. तसेच भारतीय आयुर्वेद, योग याकडे नागरिक आकर्षित झाले असून अनेक शहरात आयुर्वेद दवाखाने आणि योगा सेंटर सुरु केले आहेत. नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रातील बॉलिवूडमधील चित्रपट आवर्जून पाहिले जातात. त्यांना भारतीय नट, नट्यांचे विशेष आकर्षण आहे. तर काही राजदूतांनी महाराष्ट्रीय पुरण पोळी, पोहे, वडापाव परदेशातील नागरिकांना आवडतात. तेथील भारतीय हॉटेलमध्ये हे अन्न पदार्थ मिळतात, असे सांगितले.

या बैठकीला राजदूत सर्वश्री अतुल गोरसुर्वे (कोरिया), प्रशांत पिसे (ट्युनेशिया), रवी बांगर(कोलंबिया),अजित गुप्ते(डेन्मार्क),अहमद जावेद (सौदी अरेबिया) आदी देशातील राजदूत तसेच मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, प्रधान सचिव भूषण गगराणी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील भाजप मध्यावधी निवडणुकीसाठी तयार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

1 Comment

Click here to post a comment