‘अंबानी-अदानी हे या देशाला लुटायला निघाले आहेत, त्यांच्या कंपन्यांवर बहिष्कार टाका’

mukesh ambani

मुंबई: रविवारी संध्याकाळपासून आझाद मैदानात धरणे धरणाऱ्या मोर्चेकऱ्यांनी राजभवनाच्या दिशेने कूच केली आहे. मात्र, मोठ्या संख्येने हे मोर्चेकरी राजभवनाच्या दिशेने निघाल्याने पोलिसांनी या आंदोलकांना अडवलं आहे.  मोर्चेकरी आणि शेतकऱ्यांमध्ये झटापट झाली असल्याचे देखील वृत्त आहे. त्यामुळे मोर्चेकऱ्यांनी ‘दादागिरी नही चलेगी’ अशा घोषणा देत रस्त्यावरच एल्गार पुकारल्याने प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे.

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या आझाद मैदानापासून मंत्रालयाकडे जाणारा रस्ता पोलिसांनी बंद केला आहे. मंत्रालयाकडून इस्टर्न एक्सप्रेस हायवे, काळबादेवी रोड, मरीन लाईन्स स्टेशनकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. तर दोन्ही रस्त्यावर पोलिसांची बॅरिकेटिंग आणि मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पूर्वनियोजित कार्यक्रमांसाठी गोव्यात गेले आहेत. त्यामुळे राज्यपाल आणि मोर्चेकरी यांची भेट होणार नाही हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. यानंतर आता मोर्चेकरी हे राजभवनावर जाणार नसल्याचे वृत्त समोर येत आहे.

राज्यपालांनी महाराष्ट्राचा अपमान केला असल्याचा आरोप देखील यावेळी आंदोलकांनी केला आहे.राज्यपाल किंवा त्यांच्या सचिवांना निवेदन देण्यासाठी संयुक्त किसान मोर्च्याचे कोणतेही शिष्टमंडळ भेटायला जाणार नसल्याचे सांगत हे निवेदन आता राष्ट्रपतींना पाठवले जाणार असल्याचे संयुक्त किसान मोर्च्याने सांगितले आहे.

अंबानी आणि अदानी हे या देशाला लुटायला निघाले आहेत. अंबानी आणि अदानी यांना धडा शिकवण्यासाठी आता या दोघांच्या कंपन्यांच्या सर्व उत्पादनांवर बहिष्कार टाका असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या