fbpx

आमदार अमरसिंह पंडित समर्थक नाराज ; मुंडेंच्या उपस्थितीत होणारी गेवराईमधील बैठक रद्द

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कडून आज उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये राष्ट्रवादी पक्षाने अनेक नवीन नेत्यांना संधी दिली आहे.बीडमध्ये माजी आमदार अमरसिंह पंडित यांना वगळून बजरंग सोनावणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही घोषणा होताच बीड राष्ट्रवादीतील अंतर्गत दुफळी चव्हाट्यावर आली असून आधीच जिल्ह्यात खिळखिळ्या झालेल्या राष्ट्रवादीला आता आमदार अमरसिंह पंडित यांच्या समर्थकांच्या रोषाचा सामना करावा लागणार आहे.

बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थित पाटोदा, आष्टी, शिरूर आणि गेवराई येथे आज बैठक पार पडणार आहे. मात्र अमरसिंह पंडित यांच्या समर्थकांचा रोष पाहता पक्षावर गेवराईमध्ये संध्याकाळी सात वाजता होणारी बैठक रद्द करण्याची वेळ आली आहे.

बीड लोकसभा मतदार संघातून आमदार अमरसिंह पंडित हे यंदाचे लोकसभेचे संभाव्य उमेदवार मानले जात होते. दुसरी यादी जाहीर होण्याच्या क्षणापर्यंत अमरसिंह पंडित यांचे नाव निश्चीत मानले जात होते. परंतु दुसऱ्या यादीत पंडीत यांचे नाव डावलून बजरंग सोनावणे याचं नाव जाहीर करण्यात आलं.