Amarnath yatra- अमरनाथ यात्रेतील भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला

अमरनाथ यात्रेकरूंवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सात जण ठार तर १९ भाविक जखमी झाले आहेत. अनंतनाग जिल्ह्यात काल रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दोन पोलिस चौक्यांवर गोळीबार करून पळून जाणाऱ्या दहशतवाद्यांनी यात्रेकरूंच्या बसवर गोळीबार केला. यात पाच पहिलांसह सात जण ठार झाले. मृत यात्रेकरूंमध्ये महाराष्ट्रातल्या पालघर आणि डहाणू इथल्या दोन महिलांचा समावेश आहे. अमरनाथ दर्शनानंतर भाविकांना घेऊन, ही बस जम्मू कडे परतत होती. सुरक्षा पुरवलेल्या वाहनांच्या ताफ्यात नसलेली ही बस, सायंकाळी सात वाजेनंतरही रस्त्यावर उतरवून, बसचालकानं अमरनाथ यात्रेच्या नियमाचा भंग केल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला असून, अशा भ्याड हल्ल्यांसमोर भारत कधीही झुकणार नाही, असं म्हटलं आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.

गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज सकाळी 10 वाजता गृहमंत्रालयाची तातडीची बैठक बोलावली आहे. दरम्यान, गृहमंत्रालयाची टीम आज अनंतनागला जाणार असून अमरनाथ यात्रेतील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यात येणार आहेत.