fbpx

नवज्योत सिंह सिद्धू यांच्या विरोधात कॅप्टन अमरिंदर सिंहांनी केली राहुल गांधींकडे तक्रार

टीम महाराष्ट्र देशा : आपल्या वक्तव्यांनी नेहमीच वादाच्या कचाट्यात सापडणारे मंत्री नवज्योत सिंह सिद्धू यांची कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींकडे तक्रार करण्यात आली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि कॅबिनेट मंत्री नवज्योत सिंह सिद्धू यांच्यात चांगलाच वाद निर्माण झाला होता. तसेच लोकसभा निवडणुकीच्या काळात देखील नवज्योत सिंह सिद्धू यांनी वादग्रस्त वक्तव्य केली होती. त्यामुळे पंजाब कॉंग्रेसला या सिद्धूच्या वक्तव्याचा फटका बसणार आहे, असा दावा करत मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी राहुल गांधी यांच्याकडे सिद्धूची तक्रार केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंजाब सरकारमधील कॅबिनेटमंत्री नवज्योत सिंह सिद्धू आणि त्यांची पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांनी पंजाब काँग्रेस आणि कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यांच्या व्हिडीओ क्लीप पंजाब काँग्रेसने राहुल गांधीचे कार्यालय आणि पक्षश्रेष्ठींना पाठवल्या आहेत. अशाप्रकारची वक्तव्ये करून सिद्धू आणि त्यांच्या पत्नीने लोकसभा निवडणुकीदरम्यान, पक्षाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केल्याचा आरोप पंजाबमधील नेत्यांनी केला आहे.

दरम्यान नवज्योत सिंह सिद्धू यांची पत्नी नवज्योत कौर सिद्धू या अमृतसर लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारीसाठी इच्छूक होत्या. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यानंतर नवज्योत कौर सिद्धू यांनी कॅप्टन अमरिंदर सिंह आणि पक्ष प्रभारी आशा सिंह यांच्यावर तिकीट कापल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मंत्री नवज्योत सिंह सिद्धू आणि कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यात वादाला सुरवात झाली. त्यामुळे आता पक्षाध्यक्ष राहूल गांधी नवज्योत सिंह सिद्धू यांच्या विरोधातील तक्रारीवर काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.