‘त्यांच्या’ एका फोनमुळे मला माघार घ्यावी लागली; अमल महाडिकांची खंत

‘त्यांच्या’ एका फोनमुळे मला माघार घ्यावी लागली; अमल महाडिकांची खंत

Amal Mahadik

कोल्हापूर : कोल्हापूर विधान परिषदेच्या (Kolhapur Legislative Council) जागेवर अखेर काँग्रेस नेते आणि राज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपचे उमेदवार अमल महाडिक (Amal Mahadik) यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. अमल महाडिक आणि शौमिका महाडिक (Shaumika Mahadik) यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं सतेज पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता, पक्ष श्रेष्ठींच्या निर्देशप्रमाणे अमल महाडिक हे आपल्या समर्थकांसह आज जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज मागे घेण्यासाठी पोहचले होते. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना अमल महाडिक यांनी अर्ज मागे घेण्याचं कारण सांगितलं आहे.

मी एक भाजपचा सच्चा कार्यकर्ता आहे, म्हणून ही विधान परिषदेची निवडणूक लढवत होतो. पक्षाने जो आदेश दिला की निवडणूक लढ त्यानुसार निवडणुकीसाठी सामोरं गेलो आणि त्याच पद्धतीने आज आमचे नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा आदेश मान्य करून, भाजपचा आदेश मान्य करून मी आज माझा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे, असं अमल महाडिक म्हणाले आहेत.

इथून पुढे लगेचच राज्यात जिल्हापरिषद निवडणुका होणार आहेत. अनेक नगरपालिकांच्या निवडणुका देखील होणार आहेत. यामुळे राज्यात समन्वय राहावा, सलोखा रहावा. या दृष्टिकोनातून भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची या संदर्बात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा सुरू होती आणि आज त्यानुसार निर्णय झालेला आहे, असंही अमल महाडिक म्हणाले आहेत.

मुंबई भाजपसाठी खूप महत्वाची जागा होती, ती बिनविरोध झालेली आहे. त्याविरोधात कोल्हापूर बिनविरोध करावी, अशी मागणी होती. परंतु, धुळे-नंदुरबारची जागा देखील आम्हाला मिळाली पाहिजे, ही भूमिका भाजपच्या नेत्यांनी आग्रही ठेवल्यामुळे आज धुळे-नंदुरबारमध्ये अमरिश पटेल यांची देखील बिनविरोध करायची म्हणजे भाजपच्या दोन जागांच्या बदल्यात कोल्हापूरची एक जागा त्यांना द्यावी, हा पक्ष आदेश आज झालेला आहे. दीड वाजता देवेंद्र फडणवीस यांचा मला फोन आला आणि त्यांनी ज्या घडामोडी झाल्या त्याची माहिती दिली. या विभागात आम्ही भाजप आणि मित्रपक्ष यांच्यावतीने अमल महाडिक यांचा उमेदवारी अर्ज भरलेला होता. शौमिका अमल महाडिक यांचा उमेदवारी अर्ज भरलेला होता, हे दोन्ही अर्ज आम्ही मागे घेतलेले आहेत. या निवडणुकीत आमचे नेते महादेव महाडिक यांना फडणवीस यांनी फोन करून ही सूचना दिलेली आहे, असंही अमल महाडिक म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या: