पेट्रोल-डिझेल सोबतच आता खतांच्या किंमतीतही वाढ! शेतकरी हवालदिल

औरंगाबाद : गेल्या काही महिन्यात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने डोके वर काढले. आणि त्यातच पेट्रोल, डिझेल सोबतच घरगुती गॅस, दाळी, खाद्यपदार्थांच्या किंमतींचे दरही आस्मानाला भिडले आहेत. यामुळे सामान्य माणूस त्रस्त झाला असून घर चालवायचे कसे? असा प्रश्न त्यांच्यापुढे उपस्थित होत आहे. त्यातच शेतकर्‍यांच्या मालाला भाव मिळत नसतांना आता खासगी रासायनिक खतांच्या किंमतीमध्येही सरासरी ४०० ते ५०० रूपये एवढी विक्रमी दरवाढ केली गेली आहे.

खतांच्या भाववाढीचा आगामी निवडणुकांवर परिणाम होऊ नये, यासाठी ही भाववाढ मागे घेतली जाईल, अशी माहिती देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात एक एप्रिलनंतर भाववाढीनुसार खतांची आवक जिल्ह्यात झाली आहे. त्यामुळे आता नवीन किमतीनुसार खतांची विक्री होणार असल्याचे निश्चित झाले आहे. एप्रिल महिन्यात इफ्को कंपनीने खताच्या दरवाढीचे पत्र प्रसिद्ध केले होते. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये खळबळ उडाली होती.

त्यावर केंद्र सरकारने खतवाढ होणार नसल्याचे जाहीर केले होते. मात्र, खासगी कंपनीकडून सध्या खतांचा होणारा पुरवठा हा वाढीव दराने होत आहे. त्यामुळे भाववाढ झाली, हे निश्चित असून, शेतकर्‍यांना आता एका गोणीमागे सरासरी ४०० ते ५०० रुपये जास्तीचे खर्च करावे लागत आहेत. या विक्रमी दरवाढीमुळे शेतीवरील खर्चात आता आणखी वाढ होणार आहे. त्यामुळे शेतकरी नाराज आहेत.

१ एप्रिलपूर्वीचा खतसाठा जुन्या किमतीतच विक्री करावा, तो नवीन किमतीमध्ये विक्री करताना आढळल्यास संबंधित कृषी सेवा केंद्रावर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांनी दिला आहे. दुकानदारांनी दोन्ही दारांचे फलक लावावेत, अशी सूचनादेखील त्यांनी यावेळी केली. केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ केल्याची माहिती एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात समोर आली होती.

महत्त्वाच्या बातम्या

IMP