‘मंदिरं आणि रंग मंदिरं उघडायला परवानगी दिली म्हणजे मोठं काही केल्याचा टेंभा मिरवू नका’

ashish shelar vs uddhav thackeray

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रासह देशभरात कहर माजवला होता. आता कोरोनाची दुसरी लाट ही ओसरली असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने ठाकरे सरकारने बऱ्यापैकी निर्बंध कायम ठेवले होते. तर, मंदिरे खुली करण्यासाठी भाजपने तीव्र आंदोलने केली होती. भाजपच्या दिग्गज नेत्यांनी देखील आंदोलनांमध्ये सहभाग घेत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला होता.

आता गणेशोत्सव काळानंतर देखील कोरोना स्थिती आटोक्यात असल्याने राज्य सरकारने ऑक्टोबर महिन्यात शाळा, महाविद्यालये, मंदिरे, चित्रपटगृह, नाट्यगृह हे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा येत्या ४ ऑक्टोबर पासून सुरु होणार आहेत. तर, मंदिरे आणि सर्व धर्मियांचे प्रार्थनास्थळे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी खुली केली जाणार आहेत. दुसरीकडे, चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे देखील २२ ऑक्टोबरपासून खुली केली जाणार आहेत.

दरम्यान, ठाकरे सरकारच्या या निर्णयानंतर देखील भाजप नेते आणि आमदार ऍड. आशिष शेलार यांनी सरकारचे कान टोचले आहेत. ‘मंदिरं आणि रंग मंदिरं उघडायला परवानगी दिली म्हणजे मोठं काही तरी केल्याचा टेंभा मिरवू नका…गेली दिड वर्षात लोककलावंत, रंगकर्मी, बँकस्टेज कलाकार, तंत्रज्ञ, यांच्यावर उपासमारीची वेळ आणलीत…मंदिराजवळील अगरबत्ती, धुप-कापूर, प्रसाद विकणाऱ्यांचे हालहाल केलेत त्याचे काय?’ असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

पुढे ते म्हणाले, ‘या सगळ्यांचा आणि भाजपाचा रेटा वाढला म्हणून आज निर्णय घ्यावा लागला.. देवाची आणि भक्तांची.. नाटक, सिनेमा प्रेमी आणि रंगदेवतेची ताटातूट केलीत…कोकणात “चिपीला” जाताय तर रवळनाथासमोर हातजोडून माफी मागा…रंगदेवतेची सेवा करणाऱ्यांना नुकसान भरपाई द्या..ती मिळायलाच हवी!’

महत्त्वाच्या बातम्या