fbpx

मल्टीप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेवून जाण्यास बंदी नाही

मल्टीप्लेक्स

नागपूर – राज्यातील विविध महानगरांमधील मल्टीप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेवून जाण्यास कुठलीही बंदी नाही.अशी बंदी कोणी करत असेल तर त्यावर कारवाई करण्यासंबंधी गृह विभाग सहा आठवडयांच्या आत धोरण ठरविणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीच्या उत्तरात दिली.

विधानपरिषदेत आज धनंजय मुंडे यांनी आज उपस्थित केलेल्या लक्षवेधीत मल्टीप्लेक्स, महामार्गावरील फुडमॉल व मॉलमध्ये बाहेरील खाद्यपदार्थ खाण्यास घालण्यात येणारी बंदी आणि आतील खाद्यपदार्थांची जादा दराने होणारी विक्री याकडे सरकारचे लक्ष वेधले होते.

मल्टीप्लेक्स चालक बाहेरील खाद्यपदार्थ घेवून जाण्यास मज्जाव करतात व आतमध्ये त्यांच्याकडील खाद्यपदार्थांची चढया दराने विक्री करतात असा आरोप करून यासंबंधी कायदा करण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी केली. त्यावर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी वरील उत्तर दिले.

त्याचबरोबर पाण्याची बॉटल असेल किंवा अन्य खाद्यपदार्थ यांचे दर मल्टीप्लेक्स, मॉलमध्ये वेगळे आणि बाहेर वेगळे का? असा प्रश्न मुंडे यांनी केला. त्यावर केंद्रसरकारने केलेल्या कायद्याप्रमाणे १ ऑगस्टपासुन एकाच वस्तुची वेगवेगळी एमआरपी राहणार नसल्याचे राज्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

या लक्षवेधीमुळे यापुढे आता प्रेक्षकांना मल्टीप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेवून जाता येणार असल्याने मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच १ ऑगस्टपासुन खाद्यपदार्थांची एकच एमआरपी राहणार असल्याने मल्टीप्लेक्समध्येही त्याच किंमतीत वस्तु मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

यासंबंधी अधिक चर्चा व प्रेक्षकांच्या सोयीच्या दृष्टीने अधिक निर्णय घेण्यासाठी मंत्र्यांच्या दालनात बैठक घेण्याचे निर्देशही उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी दिले.

…जेव्हा धनंजय मुंडेंंनी पहिल्यांदा दिला होता परळीतच गोपीनाथ मुंडेंना धोबीपछाड